अश्विनला कसोटी संघाबाहेर बसवलं जातं, मग Virat Kohli टी 20 संघाबाहेर का नाही? कपिल देव यांचा सवाल
विराट कोहलीची (Virat kohli) बऱ्याच काळपासून खराब फॉर्मशी झुंज सुरु आहे. आता टीम मधील त्याच्या स्थानाबद्दल माजी क्रिकेटपटू कपिल देव (Kapil dev) यांनी मोठं विधान केलं आहे.
मुंबई: विराट कोहलीची (Virat kohli) बऱ्याच काळपासून खराब फॉर्मशी झुंज सुरु आहे. आता टीम मधील त्याच्या स्थानाबद्दल माजी क्रिकेटपटू कपिल देव (Kapil dev) यांनी मोठं विधान केलं आहे. रविचंद्रन अश्विन (R Ashwin) सारख्या फिरकी गोलंदाजाला कसोटी संघाच्या प्लेइंग इलेवनमध्ये स्थान मिळत नाही. बाहेर बसवलं जातं, मग बऱ्याच काळापासून खराब फॉर्मशी झुंज देणाऱ्या विराट कोहलीला का नाही? असा सवाल कपिल देव यांनी विचारला आहे. विराट कोहलीला संघाबाहेर करणं, हा मोठा मुद्दा बनता कामा नये. कोहली 2019 पासूनच मोठी इनिंग खेळू शकलेला नाही. कोहलीने 22 नोव्हेंबर 2019 रोजी कोलकाता कसोटीत बांगलादेश विरुद्ध शेवटचं शतक झळकावलं होतं.
तर तो त्यांच्यावर अन्याय ठरेल
“भारतीय संघ व्यवस्थापन शानदार फॉर्म मध्ये असलेल्या खेळाडूंना पुरेशा संधी देणार नाही, तर तो त्यांच्यावर अन्याय ठरेल” असं कपिल देव म्हणाले. “कसोटी क्रिकेट मधील दुसरा सर्वश्रेष्ठ गोलंदाज अश्विनला तुम्ही संघाबाहेर बसवू शकता, मग जागतिक क्रिकेट मधील नंबर 1 खेळाडू सुद्धा बाहेर बसू शकतो” असं कपिल देव म्हणाले. ते एका चॅनलवर बोलत होते.
म्हणून तुम्ही नव्या खेळाडूंना बाहेर ठेवू शकत नाही
“कोहलीने धावा कराव्यात, अशीच माझी इच्छा आहे. पण मी ज्या कोहलीला ओळखतो, तो कोहली मला सध्या फॉर्म मध्ये दिसत नाहीय. त्याने आपल्या कामगिरीच्या बळावर नाव कमावलय. पण त्याने प्रदर्शन केलं नाही, तर तुम्ही नव्या खेळाडूंना बाहेर ठेऊ शकत नाही” असं कपिल देव म्हणाले.
कोहलीसाठी गोष्टी अजून कठीण झाल्या पाहिजेत
भारताच्या वर्ल्ड कप विजेत्या संघाचे कॅप्टन कपिल देव म्हणाले की, “माझी अशी इच्छा आहे की, कोहलीसाठी गोष्टी अजून कठीण होतील, असं नव्या खेळाडुंनी प्रदर्शन करावं. त्यामुळे कोहली अजून जोरदार पुनरागमन करेल व त्यामुळेच नव्या खेळाडूंना आपल्या खेळाचा स्तर अधिक उंचावावा लागेल” चांगली स्पर्धा व्हावी एवढीच आपली इच्छा असल्याचे कपिल देव म्हणाले.