PAK vs ZIM: भारतात क्रिकेटर्स पैशात लोळतात, पण झिम्बाब्वेच्या खेळाडूंना महिन्याला किती सॅलरी मिळते माहितीये का?
PAK vs ZIM: झिम्बाब्वे क्रिकेटला पैसा कुठून मिळतो? चार ग्रेडमध्ये खेळाडूंना किती पैसे मिळतात?
पर्थ: भारत, ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडच्या खेळाडूंवर पैशांचा पाऊस पडतो. त्याचवेळी एक टीम अशी सुद्धा आहे, ज्यांचा पै न पै कमवण्यासाठी संघर्ष सुरु असतो. पण या टीमचे खेळाडू मैदानात उतरतात, तेव्हा पाकिस्तान सारख्या मजबूत टीमलाही गुडघे टेकायला भाग पाडतात. आपण बोलतोय झिम्बाब्वेबद्दल. काल या टीमने टी 20 वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानला हरवलं. पर्थमध्ये पाकिस्तानसोबत अनर्थ घडला. त्याचवेळी झिम्बाब्वे जोरदार सेलिब्रेशन झालं.
फार कमी जणांना माहित असलेलं वास्तव
झिम्बाब्वेच्या खेळाडूंनी मैदानावर डान्स केला, ड्रेसिंग रुममध्ये जल्लोष दिसला. झिम्बाब्वेच्या रस्त्यावरही या विजयाचा आनंद दिसला. लोक आनंदात नाचले. झिम्बाब्वेमध्ये काल पाकिस्तानवर मिळवलेल्या विजयामुळे प्रत्येकजण आनंदात होता. त्याचवेळी दुसऱ्याबाजूला असही वास्तव आहे, ज्याबद्दल फार कमी जणांना माहितीय.
झिम्बाब्वेचे खेळाडू दुसऱ्या क्रिकेटर्ससारखे कोट्यवधी रुपये कमवत नाहीत. त्यांच्याकडे आलिशान घर, पैसा महागड्या गाड्या असं काही नाहीय.
झिम्बाब्वेच्या क्रिकेटर्सना खूपच कमी पैसा मिळतो
‘द स्टँडर्ड’ वर्तमानपत्रानुसार, झिम्बाब्वेच्या खेळाडूंची चार ग्रेडमध्ये विभागणी करण्यात आली आहे. X ग्रेडमध्ये टॉप खेळाडू आहेत. ज्यांना दर महिन्याला 5 हजार डॉलर म्हणजे 3.20 लाख रुपये मिळतात. ए ग्रेड मधल्या खेळाडूंना महिन्याला 3500 अमेरिकी डॉलर 2.80 लाख रुपये मिळतात. ग्रेड बी मधल्या खेळाडूंना महिन्याला दीड लाख रुपये मिळतात. ग्रेड सी मधले खेळाडू महिन्याला एक लाख रुपये कमावतात.
झिम्बाब्वे क्रिकेटमध्ये पैसा नाही
झिम्बाब्वे क्रिकेट बोर्ड आर्थिक संकटाचा सामना करत आहे. अनेक वर्षांपासून बोर्डाची हालत खराब आहे. झिम्बाब्वे जास्त पैसा आयसीसीकडून मिळतो. झिम्बाब्वेच्या नॅशनल प्रीमियर लीगमध्ये जिंकणाऱ्या टीमला आयपीएल खेळाडूंच्या बेस प्राइसपेक्षा पण अर्धी रक्कम मिळते.
नॅशनल प्रीमियर लीगमध्ये विजेत्या टीमला किती रक्कम मिळते?
झिम्बाब्वे नॅशनल प्रीमियर लीगमध्ये जिंकणाऱ्या टीमला 8.50 लाख रुपये मिळतात. आयपीएलमध्ये कुठल्याही खेळाडूची बेस प्राइस 20 लाख रुपये आहे. झिम्बाब्वेकडून क्रिकेट खेळणाऱ्या खेळाडूंकडे दुसऱ्या देशांच्या क्रिकेटपटूंसारखा पैसा नाहीय. महागड्या गाड्या, आलिशान घर नाही. पण या देशाचे खेळाडू जिंकण्यासाठी निकाराने झुंज देतात.