Lalit Modi: सुष्मिता सेन बरोबरच्या अफेयरमुळे चर्चा, पण भारतीय क्रिकेट मध्ये आज पैसाच पैसा दिसतोय तो ललित मोदींमुळे
आयपीएलचे (IPL) जनक आणि बीसीसीआय (BCCI) मध्ये महत्त्वाची पद भूषवणारे ललित कुमार मोदी (Lalit Modi) पुन्हा एकदा चर्चेमध्ये आहेत. त्यांच्या एका टि्वटने भारतातच नाही, तर परदेशातही अनेकांना आश्चर्याचा धक्का दिलाय.
Lalit Modi Dating Miss Universe Sushmita Sen: आयपीएलचे (IPL) जनक आणि बीसीसीआय (BCCI) मध्ये महत्त्वाची पद भूषवणारे ललित कुमार मोदी (Lalit Modi) पुन्हा एकदा चर्चेमध्ये आहेत. त्यांच्या एका टि्वटने भारतातच नाही, तर परदेशातही अनेकांना आश्चर्याचा धक्का दिलाय. टि्वट मध्ये त्यांनी माजी मिस युनिव्हर्स सुष्मित सेन बरोबर डेटिंग सुरु असल्याची माहिती दिलीय. भारतीय क्रिकेट मध्ये एक काळ त्यांनी गाजवला. 2008 ते 2010 पर्यंत ते आयपीएलचे चेयरमन होते. आयपीएलमधील वादानंतर भारताबाहेर फरार झाले. पण त्यानंतरही आपण चर्चेत कसं रहायचं ते ललित मोदींना बरोबर जमतं. आता सगळीकडेच सुष्मिता सेन बरोबर असलेल्या त्यांच्या प्रेम संबंधांची चर्चा आहे. नेहमीच अव्वल स्थानावर रहाण्याची महत्त्वकांक्षा बाळगणाऱ्या ललित मोदींबद्दल जाणून घेऊया.
पैसा काय असतो, ते दाखून दिलं.
ललित मोदी हे अत्यंत महत्त्वकांक्षी व्यक्तीमत्व आहे. आयपीएल मधून बाहेर निघण्याआधी त्यांनी भारतीय क्रिकेटला बदलून टाकलं. पैसा काय असतो, ते दाखून दिलं. काही चांगल्या गोष्टी त्यांनी केल्या. पण वाईट गोष्टींसाठी सुद्धा ते तितकेच लक्षात रहातात. क्रिकेट विश्वात ते ज्या पद्धतीने आले, बाहेरही तसेच गेले. फुटबॉलच्या धर्तीवर फ्रेंचाजयी इंडियन प्रीमियर लीग ही त्यांचीच संकल्पना. त्यांनी ही कल्पना प्रत्यक्षात उतरवून यशस्वी करुन दाखवली.
मोदी आयपीएलचे जनक
आयपीएल वरती आजही काही जुने-जाणते क्रिकेट चाहते टीका करतात. पण आयपीएलमुळे भारतीय क्रिकेट मध्ये पैसा आला, बऱ्याच गोष्टी बदलल्या, हे नाकारता येणार नाही. 2008 मध्ये आयपीएलचा पहिला सीजन झाला. त्यावेळी भविष्यातील क्रिकेट मधली आर्थिक महाशक्ती म्हणून भारताचा उदय झाला. आज भारतीय क्रिकेट मध्ये आयपीएलच एक वेगळं महत्त्व आहे.
2018 साली पत्नी मीनल मोदीचा मृत्यू
ललित कुमार मोदी हे भारतातील एका व्यावसायिक कुटुंबाचे वंशज आहेत. 29 नोव्हेंबर 1963 रोजी कृष्ण कुमार मोदी आणि बिना मोदी यांच्या घरात त्यांचा जन्म झाला. 2018 साली पत्नी मीनल मोदीचा मृत्यू झाला. रुचिर मोदी आणि आलिया मोदी ही त्यांना दोन मुलं आहेत. 90 च्या दशकापासून त्यांचा भारतीय क्रिकेट बोर्डाशी संबंध आला. त्यावेळी ते स्पोर्ट्स पे चॅनलच्या वितरणाशी संबंधित एक व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्न करत होते. त्यावेळीच त्यांना ठाऊक होतं, लाइव स्पोर्ट्स असा एक प्रकार आहे, ज्यासाठी भारतीय ग्राहक पैसे मोजतील. लवकरच त्यांच्या लक्षात आलं की, सिस्टिम बदलायची असेल, तर त्यात सहभागी झालं पाहिजे. बीसीसीआयचे ते सर्वात कमी वयात उपाध्यक्ष बनले. लवकरच त्यांनी बोर्डामध्ये व्यावसायिकता आणली. त्यांनी 1 अब्ज डॉलरच्या पुढे महसूल पोहोचवला. 2010 साली आयपीएल मध्ये दोन नव्या फ्रेंचायजींच्या समावेशावरुन झालेल्या वादामुळे त्यांना भारतीय क्रिकेट बोर्डा बाहेर जावं लागलं.
ईडीची चौकशी मागे लागली
आयपीएल 2010 मध्ये त्यांच्यावर पदाचा दुरुपयोग, लिलाव आणि आयपीएल टेंडर मध्ये बेईमानी केल्याचा आरोप करण्यात आला. आयपीएल मध्ये घोटाळे झाल्याचे आरोप झाले. बीसीसीआयने अंतर्गत चौकशी केली. निलंबन नोटिस दिली व बंदी घातली. 2010 साली आयपीएलचा समारोप झाल्यानंतर लगेचच त्यांना या सगळ्याचा सामना करावा लागला. ईडीने त्यांच्याविरोधात चौकशी सुरु केली होती. याच दरम्यान ते लंडनमध्ये गेले. त्यानंतर अधून-मधून त्यांची चर्चा होत राहिली. आता ते सुष्मिता सेन बरोबरच्या प्रेम संबंधांमुळे चर्चेत आहेत.