AUS vs ENG, Ashes 3rd Test, Day 1: ऑस्ट्रेलियाची जबरदस्त कामगिरी, इंग्लंड अक्षरक्ष: हतबल
ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. दिवसअखेर डेविड वॉर्नरची (38) विकेट गमावून त्यांच्या एक बाद 61 धावा झाल्या आहेत.
मेलबर्न: अॅशेस मालिकेतील (Ashes series) पहिल्या दोन कसोटी सामन्यांप्रमाणे तिसऱ्या कसोटीवरही ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम आहे. मेलबर्नमध्ये तिसरा कसोटी सामना सुरु आहे. आज कसोटीच्या पहिल्या दिवसाच्या खेळावर संपूर्णपणे ऑस्ट्रेलियाचा प्रभाव होता. ऑस्ट्रेलियाच्या भेदक गोलंदाजीसमोर इंग्लंडचा पहिला डाव (Australia vs England) 185 धावात आटोपला. कर्णधार जो रुटच्या अर्धशतकी खेळीव्यतिरिक्त अन्य फलंदाजांनी सपशेल निराशा केली. ऑस्ट्रेलियाकडून कमिन्स आणि लेयॉनने प्रत्येकी तीन, स्टार्कने दोन, बोलँड आणि ग्रीनने प्रत्येकी एक विकेट घेतला.
ऑस्ट्रेलियाचा संघ फलंदाजीसाठी मैदानात उतरला आहे. दिवसअखेर डेविड वॉर्नरची (38) विकेट गमावून त्यांच्या एक बाद 61 धावा झाल्या आहेत. सलामीवीर मार्कस हॅरिस नाबाद (20) आणि नाईट वॉचमन लेयॉन मैदानावर आहे. वॉर्नरला जेम्स अँडरसनने क्रॉवलीकरवी झेलबाद केले.
आज कर्णधार पॅट कमिन्सने आपल्या धारदार गोलंदाजीने इंग्लंडला सुरुवातीपासूनच धक्के दिले. कमिन्सने इंग्लंडचा सलामीवर हासीब हमीदला भोपळाही फोडू दिला नाही. हमीदला त्याने कारेकरवी झेलबाद केले. झॅक क्रॉले (12), डेविड मलान (14) स्वस्तात बाद झाले. दोघांना कमिन्सने बाद केले. पहिल्या सत्रात ऑस्ट्रेलियाने तीन विकेट घेतल्या. त्यानंतर दुसऱ्या सत्रात भेदक मार करत ऑस्ट्रेलियाने इंग्लंडच्या तीन विकेट काढल्या.
ही कसोटी जिंकल्यास ऑस्ट्रेलियाला मालिका विजयाची संधी आहे. ऑस्ट्रेलियाने पाच कसोटी सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली आहे. अॅडलेड ओव्हलच्या मैदानावर झालेल्या दुसऱ्या डे-नाईट कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने इंग्लंडवर तब्बल 275 धावांनी विजय मिळवला होता.