MI vs RR Result, IPL 2022: आवाज कोणाचा? विजयानंतर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला डिवचलं
MI vs RR Result, IPL 2022: राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2022 (IPL 2022) ची धडाकेबाज सुरुवात केली आहे. दुसऱ्यांदा आयपीएल किताब जिंकण्याच्या इराद्याने उतरलेल्या राजस्थानने आज मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पराभव केला
मुंबई: राजस्थान रॉयल्सने आयपीएल 2022 (IPL 2022) ची धडाकेबाज सुरुवात केली आहे. दुसऱ्यांदा आयपीएल किताब जिंकण्याच्या इराद्याने उतरलेल्या राजस्थानने आज मुंबई इंडियन्सचा (Mumbai Indians) पराभव केला आहे. मुंबई इंडियन्सने पाचवेळा आयपीएलचे जेतेपद पटाकवलं आहे. राजस्थानने 23 धावांनी मुंबईवर विजय मिळवला. जोस बटलरच्या दमदार शतकाच्या बळावर राजस्थान रॉयल्सने (Rajasthan Royals) 194 धावांचे लक्ष्य दिलं. मुंबईने निर्धारीत 20 षटकात 170 धावा केल्या. राजस्थानचा हा सलग दुसरा विजय तर मुंबईचा दुसरा पराभव आहे. विशेष म्हणजे राजस्थानने प्रथम फलंदाजी करताना दोन विजय मिळवलेत. दुसरा कुठलाही संघ प्रथम फलंदाजी करताना जिंकलेला नाही. या विजयासह राजस्थानच्या खात्यात चार गुण जमा झाले आहेत. गुणतालिकेत राजस्थानचा संघ अव्वल स्थानावर आहे.
मुंबई इंडियन्सला कसं डिवचलं?
या विजयानंतर राजस्थानने आवाज कोणाचा? असं टि्वट केलं आहे. हे टि्वट म्हणजे मुंबई इंडियन्सला डिवचण्याचा प्रकार आहे. कारण महाराष्ट्रात विजयानंतर आवाज कोणाचा? म्हणून घोषणा देण्याची प्रथा आहे. आज नवी मुंबईच्या डी.वाय.पाटील स्टेडियमवर राजस्थान रॉयल्सने मुंबई इंडियन्सला पराभूत केलं. एकप्रकारे राजस्थानने मुंबईचा घरातच पराभव केला. त्यामुळे स्पर्धेतील आपला दबदबा कायम राखण्यासाठी मुंबई इंडियन्सला लौकीकाला साजेसा खेळ दाखवावा लागेल.
मुंबईच्या इंडियन्सच्या अपेक्षांवर पाणी फिरवलं
आज मुंबई इंडियन्सने टॉस जिंकून राजस्थान रॉयल्सला प्रथम फलंदाजीला निमंत्रित केलं. मुंबईला यशस्वी जैस्वालच्या रुपाने पहिली विकेट लवकर मिळाली. पण जोस बटलरने धुवाधार फलंदाजी करुन मुंबईच्या इंडियन्सच्या अपेक्षांवर पाणी फिरवलं. राजस्थानच्या 194 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायला उतरलेल्या मुंबई इंडियन्सची सुरुवता चांगली झाली नाही.
Aawaz konaacha? ?
— Rajasthan Royals (@rajasthanroyals) April 2, 2022
कॅप्टन रोहित शर्मा स्वस्तात बाद झाला. मागच्या सामन्याप्रमाणे इशान किशनने डाव सावरला. त्याने 54 धावांची खेळी केली. आज सर्वाधिक प्रभावित केलं, ते तिलक वर्माने. त्याने 33 चेंडूत 61 धावांची तुफान खेळी केली. हे दोन युवा फलंदाज खेळपट्टीवर असताना, मुंबई इंडियन्स सामना जिंकू शकतो, असं दिसतं होतं. पण हे दोघे बाद होताच मुंबईचा डाव गडगडला व सलग दुसऱ्या पराभवाची नोंद झाली.