BCCI च्या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये दोन खेळाडूंना लॉटरी, एका मुंबईकराची एन्ट्री, प्रमोशनमुळे सिराजला थेट कोट्वधींचा फायदा
BCCI ने नव्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट सिस्टिममध्ये यंदा 28 ऐवजी 27 खेळाडूंबरोबर करार केला आहे. अनेक खेळाडूंची ग्रेड बदलण्यात आली आहे. ग्रेड बदल म्हणजे खिशाला फटका, तो ही कोट्वधी रुपयांचा.
मुंबई: BCCI ने नव्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट सिस्टिममध्ये यंदा 28 ऐवजी 27 खेळाडूंबरोबर करार केला आहे. अनेक खेळाडूंची ग्रेड बदलण्यात आली आहे. ग्रेड बदल म्हणजे खिशाला फटका, तो ही कोट्वधी रुपयांचा. त्यामुळे अनेक खेळाडू निश्चित नाराज झाले असतील. पण या निराश चेहऱ्यांमध्ये दोन खेळाडू निश्चितच खूप आनंदात असतील. कारण त्यांना एकप्रकाने लॉटरी लागली आहे. मैदानावर सातत्यपूर्ण चांगली कामगिरी करण्याचा त्यांना झालेला हा एकप्रकारचा लाभ आहे. नव्या कॉन्ट्रॅक्ट सिस्टिममध्ये अनेक खेळाडंचं डिमोशन झालं आहे, तर एका प्लेयरचा प्रमोशन झालं आहे. मोहम्मद सिराजची (Mohammad Siraj) ग्रेड वाढवण्यात आली आहे. त्याचवेळी वेस्ट इंडिज विरुद्धच्या टी 20 मालिकेत जबरदस्त कामगिरी करणाऱ्या सूर्यकुमार यादवचा (Suryakumar Yadav) पहिल्यांदाच सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट सिस्टिममध्ये प्रवेश झाला आहे. BCCI ने नव्या कॉन्ट्रॅक्टमध्ये 27 खेळाडूंची चार वेगवेगळया ग्रेडमध्ये विभागणी केली आहे. ग्रेड नुसार दरवर्षी खेळाडूंना वेगवेगळी रक्कम दिली जाते. ग्रेड ए प्लसमधल्या खेळाडूंना वर्षाला सात कोटी रुपये मिळतात. तेच ग्रेड ए मधल्या खेळाडूंना पाच कोटी, ग्रेड बी मधल्यांना तीन कोटी आणि ग्रेड सी मधल्या खेळाडूंना एक कोटी रुपये मिळतात.
सिराजचं प्रमोशन, दोन कोटीचा फायदा
भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज बीसीसीआयच्या सेंट्रल कॉन्ट्रॅक्ट सिस्टिममध्ये ग्रेड सी चा हिस्सा होता. नव्या करारात बोर्डाने त्याला प्रमोट करुन ग्रेड सी ऐवजी ग्रेड बी मध्ये स्थान दिले आहे. त्यामुळे सिराजला मिळणाऱ्या पैशांमध्ये सुद्धा फरक पडला आहे. आता मोहम्मद सिराजला वर्षाला 1 कोटी रुपयांऐवजी 3 कोटी रुपये मिळतील.
सूर्यकुमारला पहिल्यांदाच स्थान
भारताचा मधल्याफळीतील फलंदाज सूर्यकुमार यादवला पहिल्यांदाच बीसीसीआयच्या कॉन्ट्रॅक्ट लिस्टमध्ये स्थान मिळाले आहे. सूर्यकुमारचा ग्रेड सी मध्ये प्रवेश झाला आहे. म्हणजेच सूर्यकुमाराला आता वर्षाला एक कोटी रुपये मिळतील. बीसीसीआयच्या नव्या करारानुसार, ग्रेड ए प्लसमध्ये तीन, ग्रेड ए मध्ये पाच, ग्रेड बी मध्ये सात आणि ग्रेड सी मध्ये बारा खेळाडू आहेत.
BCCI केलेल्या नव्या कराराची यादी
ग्रेड ए प्लस : विराट कोहली, रोहित शर्मा, जसप्रीत बुमराह.
ग्रेड ए : रविचंद्रन अश्विन, रविंद्र जडेजा, केएल राहुल, मोहम्मद शमी, ऋषभ पंत.
ग्रेड बी : अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा, अक्षर पटेल, शार्दुल ठाकुर, श्रेयस अय्यर, मोहम्मद सिराज, इशांत शर्मा.
ग्रेड सी : शिखर धवन, उमेश यादव, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, दीपक चाहर, शुभमन गिल, हनुमा विहारी, वॉशिंगटन सुंदर, युजवेंद्र चहल, मयंक अग्रवाल, सूर्य कुमार यादव, ऋद्धिमान साहा.
mohammed siraj and suryakumar yadav rewarded in bcci contract list