IND vs SL 1st t20 : धोनीने ज्याला शिकवून घडवलं, तोच खेळाडू पहिल्या T20 मध्ये भारताला पडू शकतो भारी
IND vs SL 1st t20 : टीम इंडियाच्या श्रीलंका दौऱ्याला आजपासून सुरुवात होत आहे. टीम इंडिया आज पहिला T20 सामना खेळणार आहे. भारताचे तीन दिग्गज विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजा यापुढे टीम इंडियाच्या T20 संघात खेळताना दिसणार नाहीत. सूर्यकुमार यादवच्या टीममध्ये युवा आणि अनुभवी खेळाडूंच मिश्रण आहे.
एकाबाजूला भव्य पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेला सुरुवात झालेली असताना दुसऱ्या बाजूला टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर आहे. T20 सीरीजने या दौऱ्याला सुरुवात होत आहे. भारत आणि श्रीलंकेविरुद्ध आज पहिला T20 सामना होणार आहे. सूर्यकुमार यादवच्या रुपाने टीम इंडियाला रोहित शर्मानंतर T20 मध्ये पूर्णवेळ कॅप्टन मिळाला आहे. हार्दिक पांड्या टीम इंडियाच्या कर्णधारपदाच्या शर्यतीत आघाडीवर होता. पण दुखापतींमुळे पूर्णवेळ कॅप्टन बनण्याची त्याची संधी हुकली. विराट कोहली, रोहित शर्मा आणि रवींद्र जाडेजा या भारताच्या तीन स्टार खेळाडूंनी T20 मधून निवृत्ती घेतली आहे. त्यांच्याशिवाय खेळणारी टीम इंडिया फक्त एका मॅचपुरती नाही, तर सीरीज जिंकण्यासाठी फेव्हरेट आहे. श्रीलंकन संघ टीम इंडियासमोर कमकुवत वाटत असला, तर त्यांच्या एका खेळाडूपासून धोका आहे. त्याच्यामध्ये भारताला धक्का देण्याची क्षमता आहे.
श्रीलंकेच्या त्या प्लेयरच नाव आहे, माहीश तीक्ष्णा. 2008 साली श्रीलंकेचा अंजठा मेंडीस टीम इंडियावर भारी पडला होता. माहीश तीक्ष्णा या दौऱ्यात अशीच करामत करुन दाखवेल का? या प्रश्नाच उत्तर लवकरच मिळेल. जर असं झालं, तर श्रीलंकेचा कॅप्टन चारिथ असलंकाने भारताचा महान खेळाडू महेंद्रसिंह धोनीचे आभार मानले पाहिजेत. माहीश तीक्ष्णा इंडियन प्रीमियर लीगमध्ये धोनीच्या चेन्नई सुपर किंग्स टीमकडून खेळतो. धोनीने CSK ची टीम घडवली. टीममधल्या प्रत्येक प्लेयरची क्षमता काय आहे? त्याचा कसा वापर करुन घ्यायचा हे धोनीला माहित असतं.
त्यावेळी त्याच्यासाठी धोनी तिथे उभा असतो
धोनी वेळोवेळी मार्गदर्शन करत असतो. कसोटीच्या क्षणी धोनीचे सल्ले खेळाडूंसाठी किती उपयुक्त ठरतात, हे आयपीएलमध्ये वेळोवेळी दिसून आलय. हा तीक्ष्णा यांच धोनीच्या तालिमीत तयार झाला आहे. धोनीने त्याला कुठल्या प्रसंगात कशी गोलंदाजी करायची हे डावपेच शिकवले आहेत. माहीश तीक्ष्णा यॉर्कर चेंडू टाकायला शिकला, याच श्रेय धोनीला जातं. आता मी काही करु शकत नाही, अशी स्थिती उदभवते, त्यासाठी तिथे धोनी त्याच्यासाठी उभा असतो. त्यामुळे धोनीने घडवलेला हा खेळाडू टीम इंडियालाच भारी पडू शकतो.