MCA Election: आशिष शेलारांचा अर्ज दाखल, शरद पवार गटाविरुद्ध सामना
मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीत शरद पवार विरुद्ध आशिष शेलार सामना
दिनेश दुखंडे, TV9 मराठी मुंबई: यंदा मुंबई क्रिकेट असोशिएशनची निवडणूक (MCA Election) रंगतदार होणार आहे. आशिष शेलारांनी (Asish Shelar) मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीसाठी आज अर्ज दाखल केला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad pawar) यांच्या गटाकडून संदीप पाटील निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे यंदा माजी क्रिकेटपटू विरुद्ध राजकारणी असा सामना रंगणार आहे.
शेलार याआधी सुद्धा एमसीएचे अध्यक्ष होते
तब्बल 11 वर्षानंतर मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीत क्रिकेटपटू विरुद्ध राजकारणी अशी लढत होणार आहे. आशिष शेलार यांनी याआधी सुद्धा एमसीएच अध्यक्षपद भूषवलं आहे. आशिष शेलार सध्या मुंबई भाजपाचे अध्यक्ष आहेत.
एमसीए निवडणुकीत एक दुर्मिळ योग
दरम्यान मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीत एक दुर्मिळ योग पहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या क्लबकडून मतदानाचा हक्क बजावतील. मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीसाठी मतदारांची यादी दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली आहे.
यावेळी शरद पवार आशिष शेलारांच्या क्लबकडून मतदानाचा हक्क बजावतील. पारसी पायोनियर क्लबची मालकी आशिष शेलारांकडे आहे. पारसी पायोनियर क्लबची मालकी रमांकात आचरेकर सरांच्या कुटुंबियांकडे होती.
आचरेकर कुटुंबियांकडून विकत घेतला क्लब
दोन आठवड्यांपूर्वी आशिष शेलारांनी हा क्लब आचरेकर कुटुंबियांकडून विकत घेतला. येत्या 20 ऑक्टोबरला मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक होणार आहे.