MCA Election: शरद पवार आशिष शेलारांच्या क्लबकडून बजावणार मतदानाचा हक्क
मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीत दिसणार एक दुर्मिळ योग
मुंबई: मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीत एक दुर्मिळ योग पहायला मिळणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांच्या क्लबकडून मतदानाचा हक्क बजावतील. मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या निवडणुकीसाठी मतदारांची यादी दोन दिवसांपूर्वी प्रसिद्ध झाली आहे.
आशिष शेलारांनी कुठला क्लब विकत घेतला?
येत्या 20 ऑक्टोबरला मुंबई क्रिकेट असोशिएशनच्या कार्यकारिणीची निवडणूक होणार आहे. यावेळी शरद पवार आशिष शेलारांच्या क्लबकडून मतदानाचा हक्क बजावतील. पारसी पायोनियर क्लबची मालकी आशिष शेलारांकडे आहे.
पारसी पायोनियर क्लबची मालकी रमांकात आचरेकर सरांच्या कुटुंबियांकडे होती. दोन आठवड्यांपूर्वी आशिष शेलारांनी हा क्लब आचरेकर कुटुंबियांकडून विकत घेतला.
आशिष शेलारांकडे आता किती क्लब?
आशिष शेलारांकडे आता दोन क्लबची मालकी आहे. राजस्थान क्रिकेट क्लब आणि पायोनियर क्लबची मालकी आशिष शेलारांकडे आहे. एमसीए निवडणुकीसाठी आजपासून अर्ज भरता येऊ शकतात. शरद पवार गटाकडून आठ तारखेला उमेदवारी अर्ज दाखल होईल.
क्रिकेटपटू विरुद्ध राजकारणी?
शरद पवार गटाकडून माजी क्रिकेटपटू संदीप पाटील निवडणूक लढवू शकतात. आशिष शेलार सुद्धा एमसीए अध्यक्षपदाच्या निवडणूक रिंगणात उतरु शकतात. असं झाल्यास बऱ्याच वर्षानंतर क्रिकेटपटू विरुद्ध राजकारणी असा सामना रंगेल.