Dilip Vengsarkar | दिलीप वेंगसरकरांनी मुंबई संघाची कामगिरी सुधारण्यासाठी गुरू व्हावे, MCA चे साकडे
क्रिकेट इम्प्रूव्हमेंट कमिटीतील सदस्य जतीन परांजपे (अध्यक्ष), विनोद कांबळी आणि नीलेश कुलकर्णी यांना हटवण्यात यावे, अशी मागणीही या बैठकीत MCA अध्यक्षांकडे करण्यात आली.
मुंबई : मुंबई क्रिकेटला गतवैभव प्राप्त करुन देण्यासाठी भारतीय संघाचे माजी कर्णधार आणि मुख्य सिलेक्टर दिलीप वेंगसरकर (Dilip Vengsarkar) यांना मुंबई क्रिकेट असोसिएशन (Mumbai Cricket Association) साकडं घालणार आहे. दिलीप वेंगसरकर यांनी मुंबई संघाची कामगिरी सुधारण्यासाठी मार्गदर्शकाची भूमिका पार पाडावी, अशी मागणी एमसीएतर्फे केली जाणार आहे. एमसीएच्या विशेष आढावा बैठकीत विश्वस्तांचा कल वेंगसरकरांच्या बाजूने होता. सय्यद मुश्ताक अली T20 आणि विजय हजारे एकदिवसीय सामना मालिकेत मुंबईच्या ढिसाळ कामगिरीबाबत चिंतन करण्यासाठी बैठक आयोजित करण्यात आली होती.
दिलीप वेंगसरकर यांनी असमर्थता दर्शवल्यास मुंबई क्रिकेटचे नाव उंचावलेल्या अन्य ज्येष्ठ माजी क्रिकेटपटूशी MCA संपर्क साधेल. एमसीएचे खजिनदार जगदीश आचरेकर यांनी अध्यक्ष डॉ. विजय पाटील यांना पत्र लिहून आढावा बैठक घेण्याची मागणी केली होती. त्यानुसार काल, (मंगळवार 21 डिसेंबरला) बैठक आयोजित करण्यात आली होती.
बैठकीत चिंतन केलेले अन्य महत्त्वाचे मुद्दे
- क्रिकेट इम्प्रूव्हमेंट कमिटी (CIC) तील सदस्य जतीन परांजपे (अध्यक्ष), विनोद कांबळी आणि नीलेश कुलकर्णी यांना हटवण्यात यावे, अशी मागणी MCA अध्यक्षांकडे करण्यात आली.
- मुंबई क्रिकेट संघाच्या दारुण पराभवाबद्दल MCA अध्यक्ष अत्यंत व्यथित आहेत
- CIC सदस्य विनोद कांबळी हे मुंबई संघाच्या ढिसाळ कामगिरीमुळे कमालीचे निराश आहेत.
संघाचे प्रशिक्षक अमोल मुजुमदार यांच्या मते, सततच्या पराभावामुळे संघातील खेळाडूंवर मानसिक ताण आला असून त्यातून बाहेर पडण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे. तसंच आगामी रणजी करंडकासाठी मुंबई संघाला कोलकात्यात खेळावे लागणार असल्याने तिथे आधी जाऊन सराव सामने खेळावेत.
विश्वस्तांची चिंता अध्यक्षांपर्यंत
यावेळी, संघातील खेळाडू निवड प्रक्रियेबाबत MCA विश्वस्तांमध्ये असलेली चिंता अध्यक्षांनी ऐकली. खराब खेळाचे खापर प्रशिक्षकांनी संघातील खेळाडूंवर फोडलं. प्रशिक्षकांच्या मते प्रोसेस, प्रीपरेशन आणि एक्झिक्यूशन या तीन बाबी प्रशिक्षकांसाठी महत्वाच्या होत्या. त्यापैकी एक्झिक्यूशनचा खेळाडूंमध्ये अभाव आढळल्याचे प्रशिक्षकाचे म्हणणे आहे.
संबंधित बातम्या :
कसोटी मालिकेपूर्वीच दक्षिण आफ्रिकेच्या संघाला झटका, ‘हा’ खेळाडू दुखापतीमुळे संघाच्या बाहेर
‘कुलदीप यादवच्या स्तुतीनं भारावलो, पण मला एकटं पडल्यासारखं वाटत होतं’