Cricketer death | धक्कादायक, मुंबईत फिल्डिंग करताना दुसऱ्या मॅचचा बॉल लागून क्रिकेटरच्या आयुष्याचा शेवट
Cricketer death | मांटुग्याच्या प्रसिद्ध रमेश दडकर मैदानात ही दुर्देवी घटना घडली. एकाचवेळी वेगवेगळ्या नेट्समध्ये इथे प्रॅक्टिस चालते. मैदानावर एकाचवेळी अनेक मॅचेस सुरु असतात.
मुंबई : मुंबईत सीजन बॉल लागून एका क्रिकेटपटूचा मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. मैदानात एकाचवेळी दोन सामने सुरु होते. त्यावेळी दुसऱ्या मॅचमधील फलंदाजाने मारलेला चेंडू लागल्याने जयेश सावला नावाच्या क्रिकेटपटूचा मृत्यू झाला. त्यांचे वय 52 वर्ष होते. चेंडू लागला त्यावेळी जयेश सावला फिल्डिंग करत होते. ज्या बॅट्समनने चेंडू मारला त्याच्याकडे जयेश सावला यांची पाठ होती. कानाचा मागच्या भागावर सीजन बॉल जोरात येऊन लागला. जयेश सावला तिथेच खाली कोसळले. त्यांना लगेच नजीकच्या रुग्णालयात नेण्यात आलं. पण वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.
मांटुग्याच्या प्रसिद्ध रमेश दडकर मैदानात ही दुर्देवी घटना घडली. या मैदानात सीजन बॉल क्रिकेट खेळल जातं. एकाचवेळी वेगवेगळ्या नेट्समध्ये इथे प्रॅक्टिस चालते. मैदानावर एकाचवेळी अनेक मॅचेस सुरु असतात. त्यातून ही दुर्देवी घटना घडली.
यावेळी पहिल्यांदा मृत्यू
या मैदानावर दोन्ही मॅच कुटची विसा ओस्वाल विकास लिजिंड कपसाठी खेळले जात होते. ही 50 वर्षावरील वयोगटासाठी T20 स्पर्धा आहे. एकाचवेळी दोन किंवा त्यापेक्षा अधिक सामने मुंबईत होण अजिबात नवीन नाही. कारण मुंबईत खेळाची मैदान कमी होत चालली आहेत. याआधी सुद्धा एकाचवेळी अनेक सामने सुरु असल्याने खेळाडूंना दुखापती झाल्या आहेत. यावेळी पहिल्यांदा मृत्यू झालाय.
किती वाजता रुग्णालयात नेलं?
पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केलीय. शवविच्छेदनाचा आदेश दिलाय पण यात घातपाताची शक्यता नाहीय. मृतदेह कुटुंबीयांकडे सोपवण्यात आलाय. लायन ताराचंद हॉस्पिटलचे वैद्यकीय अधिकारी म्हणाले की, संध्याकाळी 5 च्या सुमारास सावला यांना मृतावस्थेत आणण्यात आलं.