टेन्शन… टेन्शन… IPLमधून थेट कर्णधारच बाहेर होणार?; मुंबई इंडियन्सला प्रचंड मोठा धक्का
आयपीएल 2024साठी अवघे काही महिने राहिले आहेत. मात्र, त्यापूर्वीच मुंबई इंडियन्ससाठी निराशाजनक बातमी आहे. मुंबई इंडियन्सचा कर्णधार हार्दिक पंड्या या सामन्यात खेळण्याची शक्यता फार कमी आहे. हार्दिक दुखापतीमुळे बेजार आहे. तो कधी बरा होईल याची काही शाश्वती नाही. त्यामुळे तो खेळण्याची शक्यता फारच कमी असल्याने मुंबई इंडियन्ससाठी हा फार मोठा धक्का असल्याचं सांगितलं जात आहे.
नवी दिल्ली | 23 डिसेंबर 2023 : टीम इंडियाचा ऑलराऊंडर स्टार खेळाडू आणि मुंबई इंडियन्सचा कर्णधार बनलेल्या हार्दिक पंड्याशी संबंधित वाईट बातमी आहे. आयपीएल 2024च्या सामन्यातून बाहेर होण्याची शक्यता आहे. हार्दिकच्या घोट्याला गंभीर दुखापत झाली आहे. त्याची दुखापत गंभीर असून आयपीएल पूर्वी तो फिट होणं कठिण आहे. त्यामुळेच त्याला आयपीएल सामना मुकावा लागणार आहे. थेट कर्णधारालाच आयपीएलच्या सामन्यापासून दूर राहावे लागणार असल्याने मुंबई इंडियन्सला मोठा झटका बसणार आहे. मुंबई इंडियन्सच नाही तर टीम इंडियालाही त्याचा फटका बसणार आहे.
एका रिपोर्टमध्ये हा दावाच करण्यात आला आहे. दुखापतीमुळे हार्दिक पंड्या आयपीएल खेळू शकणार नाही. एवढेच नव्हे तर आजारपणात बराच काळ जाणार असल्याने क्रिकेटच्या कोणत्याही प्रकारात तो खेळणार नसल्याचं या रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. जानेवारीत आफगाणिस्तान विरोधात टी-20 सीरिज होणार आहे. तसेच आयपीएल 2024चे सामनेही होणार आहेत. त्याला टी-20 सीरिज आणि आयपीएलपासूनही दूर राहावे लागणार आहे. हार्दिकला बरे होण्यासाठी दोन ते तीन महिन्याचा कालावधी जाणार असल्याचं सांगितलं जात आहे.
अपडेट नाही
हार्दिक पंड्या आफगाणिस्तानच्या सीरिजसाठी फिट राहणार नाही, असं सांगितलं जात होतं. मात्र, बीसीसीआय किंवा मुंबई इंडियन्सकडून हार्दिक पंड्याच्या फिटनेसबाबत कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. किंवा त्याच्या दुखापतीविषयीची अपडेटही देण्यात आलेली नाही.
वर्ल्डकपमध्ये दुखापत
वनडे वर्ल्ड कप 2023मध्ये बांगलादेश विरुद्ध खेळताना हार्दिकला दुखापत झाली होती. एक चेंडू रोखण्याच्या नादात त्याच्या पायाच्या घोट्याला मोठी दुखापत झाली. तेव्हापासून तो वर्ल्ड कपपासून दूर आहे. त्याला मध्येच वर्ल्ड कप सोडावा लागला होता. सध्या त्याची दुखापत भरून निघत आहे. मात्र, कितपत दुखापत भरून निघत आहे याची माहिती देण्यात आलेली नाही. हार्दिक आयपीएलपर्यंत संघात पुनरागमन करेल असं सांगितलं जात होतं. पण अजूनपर्यंत त्यावर काहीच अपडेट आलेली नाही.
कर्णधार कोण?
हार्दिक पंड्याकडे मुंबई इंडियन्सचं कर्णधार पद देण्यात आलं होतं. आयपीएल 2024 च्या आधी झालेल्या खेळाडूंच्या लिलावावेळी हार्दिकने गुजरात टायटन्स सोडलं होतं. त्यानंतर तो मुंबई इंडियन्समध्ये सामील झाला. मुंबईने त्याला कर्णधारही केलं. तर रोहित शर्माचं कर्णधारपद काढून घेतलं होतं. मात्र, सध्या हार्दिकच फिट नाही. त्यामुळे त्याच्या जागी मुंबई इंडियन्सचं कर्णधारपद कोण सांभाळणार हा प्रश्न आहे. कर्णधारपदाची सूत्रे पुन्हा रोहित शर्माकडे दिली जाणार का? अशी चर्चाही आता होत आहे.
IPL 2024 साठी मुंबई इंडियन्सचा संघ : हार्दिक पंड्या (कर्णधार), रोहित शर्मा, डेवाल्ड ब्रेव्हिस, सूर्यकुमार यादव, इशान किशन, तिलक वर्मा, टिम डेव्हिड, विष्णू विनोद, अर्जुन तेंडुलकर, शम्स मुलानी, नेहाल वढेरा, जसप्रीत बुमराह, कुमार कार्तिकेय, पीयूष चावला, आकाश मढवाल, जेसन बेहरनडॉर्फ, रोमारियो शेफर्ड, जेराल्ड कोइटजी, दिलशान मधुशंका, श्रेयस गोपाल, नमन धीर, अंशुल कंबोज, नुवान तुशारा, मोहम्मद नबी, शिवालिक शर्मा