Jasprit Bumrah : हार्दिकला मुंबई इंडियन्समध्ये कशी वागणूक मिळाली? बुमराहकडून मोठा खुलासा
Jasprit Bumrah : मुंबई इंडियन्सने आयपीएल 2024 आधी सर्वांनाच हैराण करणारा एक मोठा निर्णय घेतला. रोहित शर्माला कॅप्टनशिपवरुन हटवलं. त्याच्याजागी हार्दिक पांड्याला कॅप्टन बनवलं. हार्दिक पांड्याला यंदाच्या आयपीएल सीजनमध्ये प्रचंड ट्रोलिंगचा सामना करावा लागला. मुंबई इंडियन्सच्या टीममध्ये दोन गट पडल्याच्या बातम्या आल्या. आता यावर टीमचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने भाष्य केलं आहे.
टीम इंडिया T20 सीरीजसाठी सध्या श्रीलंकेत आहे. जसप्रीत बुमराहची या सीरीजसाठी निवड झालेली नाही. त्याला विश्रांती देण्यात आली आहे. भारतात असलेला बुमराह हार्दिक पांड्याबद्दल काही गोष्टी बोलला आहे. जसप्रीत बुमराहने एका कार्यक्रमात हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बनल्यानंतर टीममध्ये कसं वातावरण होतं, त्या बद्दल भाष्य केलय. “हार्दिक पांड्या कॅप्टन बनल्यानंतर मुंबईची संपूर्ण टीम त्याच्यासोबत होती. प्रत्येक खेळाडू परस्परास सोबत होता. ऐकमेकाची मदत करत होतो” असं बुमराह म्हणाला.
बुमराह इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हणाला की, “मी हार्दिकसोबत खूप क्रिकेट खेळलोय. ज्यावेळी त्याला मदतीची गरज होती, प्रत्येक खेळाडू सोबत होता. आम्ही टीम म्हणून कुठल्याही खेळाडूला एकटं सोडत नाही” “सगळं जग हार्दिकच्या विरोधात होतं. टीमचा प्रत्येक खेळाडू त्याच्यासोबत बोलत होता” असं बुमराह म्हणाला. ‘टीम इंडियाने वर्ल्ड कप जिंकल्यानंतर सगळ्यांची विचार करण्याची पद्धत बदललीय’ असं बुमराह म्हणाला.
हार्दिकसोबत योग्य झालं नाही
हार्दिक पांड्यासोबत आयपीएल दरम्यान काहीही योग्य झालं नाही. सर्वातआधी त्याला फॅन्सनी जास्त ट्रोल केलं. लाइव्ह मॅचमध्ये त्याच्याविरोधात हूटिंग झाली. मुंबई इंडियन्सची टीम प्लेऑफमध्ये पोहोचू शकली नाही. व्यक्तीगत आयुष्यातही समस्या सुरु होत्या. नताशा स्टानकोविक आणि हार्दिक सोबत राहत नव्हते. आता टीम वर्ल्ड चॅम्पियन बनल्यानंतर हार्दिकने घटस्फोट घेत असल्याच जाहीर केलय. हार्दिक पंड्या आता टीम इंडियाचा उपकर्णधारही नाहीय. भविष्याचा विचार करुन त्याच्या जागी शुभमन गिलची निवड केलीय.