WTC Final : 628 दिवसांपूर्वी ज्यांनी टीम इंडियाला जखम दिली, त्यांनीच आज मलम लावलं
WTC Final : 628 दिवसांपूर्वी काय घडलं होतं? आज त्यांनीच दिला आनंद. 628 दिवसांपूर्वी ज्यांच्यामुळे टीम इंडियाला वेदना मिळाल्या होत्या, त्रास झालेला, त्यांच्यामुळे आज हे शक्य झालय.
WTC Final : वेदना देणारेच कधी कधी तुमच्या जखमेवर मलम लावतात. टीम इंडियासोबत असंच काहीस झालय. भारतीय टीम WTC च्या फायनलमध्ये पोहोचली आहे. कालपर्यंत तळ्यात-मळ्यात असलेल्या टीम इंडियाने किनारा गाठलाय. 628 दिवसांपूर्वी ज्यांच्यामुळे टीम इंडियाला वेदना मिळाल्या होत्या, त्रास झालेला, त्यांच्यामुळे आज हे शक्य झालय. 2 वर्षांपूर्वी टीम इंडियाला न्यूझीलंडने WTC चॅम्पियन बनण्यापासून रोखलं होतं. आता त्याच न्यूझीलंडमुळे टीम इंडियाला WTC च्या फायनलमध्ये खेळण्याची संधी मिळाली आहे.
628 दिवसांपूर्वी 23 जून 2021 रोजी भारताचा वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या फायनलमध्ये पराभव झाला होता. साऊथॅम्पटनच्या मैदानात टीम इंडियाचा पराभव झाला होता. न्यूझीलंडने टीम इंडियाला पराभूत केलेलं. न्यूझीलंडची टीम यंदा WTC चा किताब डिफेंड करु शकणार नाहीय. त्यांनी श्रीलंकेवर विजय मिळवून टीम इंडियासाठी WTC फायनलचे दरवाजे उघडलेत.
न्यूझीलंडमुळे भारताला तिकीट
श्रीलंकेविरुद्ध क्राइस्टचर्चमध्ये सामना झाला. न्यूझीलंडने या सामन्यात दोन विकेट राखून विजय मिळवला. त्यामुळे भारताच WTC च्या फायनलमध्ये तिकीट पक्क झालं. WTC 2023 ची फायनल आता भारत आणि ऑस्ट्रेलियाच्या टीममध्ये 7 जूनपासून रंगणार आहे.
आज स्पष्ट झालं
ऑस्ट्रेलिया WTC च्या फायनलमध्ये पोहोचणारा पहिला संघ ठरलाय. त्यांनी इंदोर कसोटी जिंकून फायनलच तिकीट मिळवलं. फक्त भारत आणि श्रीलंकेच्य़ा टीममधून फायनलमध्ये कोण पोहोचणार? ते स्पष्ट व्हायच बाकी होतं. भारताला फायनलच तिकीट मिळवण्यासाठी अहमदाबाद कसोटीत विजय आवश्यक होता. श्रीलंकेसमोर काय पर्याय होते?
श्रीलंकेला WTC च्या फायनलमध्ये पोहोचण्यासाठी न्यूझीलंड विरुद्धच्या 2 टेस्ट मॅचच्या सीरीजमध्ये क्लीन स्वीप करावं लागणार होतं. न्यूझीलंडने दोन पैकी एक कसोटी जिंकली किंवा टेस्ट सीरीज बरोबरीत संपली, तर अशा स्थितीत श्रीलंकेची टीम रेसच्या बाहेर जाईल व भारताच WTC फायनलच तिकीट पक्क होणार होतं. श्रीलंकेची टीम हरली त्यामुळे भारताच तिकीट पक्क झालं.