T20 World Cup: भारताविरुद्धच्या सामन्यापूर्वी न्यूझीलंड संघावर संकट, दिग्गज खेळाडू बाहेर होण्याची दाट शक्यता
भारताचा टी20 विश्वचषकातील पुढील सामना न्यूझीलंड संघाविरुद्ध असणार आहे. पण या सामन्यापूर्वी भारतासाठी एक महत्त्वाची बातमी समोर आली असून न्यूझीलंडचा दिग्गज खेळाडू या सामन्याला मुकण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे.
T20 World Cup 2021: यंदाच्या टी20 विश्वचषकात (T20 World Cup 2021) भारतीय संघाची सुरुवात अतिशय खराब झाली आहे. पाकिस्तानने 10 विकेट्सनी मात दिल्यानंतर आता भारतीय संघाला उर्वरीत सामने मोठ्या फरकाने जिंकणे गरजेचे आहे. त्यात पुढील सामना रविवारी (31 ऑक्टोबर) न्यूझीलंड संघासोबत असणार आहे. दरम्यान या सामन्यापूर्वीच एक बातमी समोर आली असून संघाचा अनुभवी फलंदाज मार्टीन गप्टिल (Martin Guptill) दुखापतीमुळे या सामन्याला मुकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात मार्टीनला अंगठ्याला दुखापत झाली होती.
मंगळवारी (26 ऑक्टोबर) पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलंड सामन्यात पाकने न्यूझीलंडला 5 विकेट्सनी मात दिली. याचवेळी फलंदाजी दरम्यान मार्टीनच्या अंगठ्याला हारिस रऊफ याने फेकलेला चेंडू लागला होता. त्यानंतर सामना झाल्यावर संघाचे मुख्य कोच गॅरी स्टीड यांनी पत्रकारांशी बोलताना मार्टीनच्या दुखापतीबद्दल पत्रकारांना माहिती दिली. त्यांनी मार्टीनची दुखापत ठिक होण्यासाठी नेमका कितीवेळ लागेल माहित नसल्याने तो भारताविरुद्ध सामन्यासाठी हुकु शकतो असं म्हटलं आहे. दरम्यान न्यूझीलंडचा मुख्य गोलंदाज लॉकी फर्ग्यूसन याआधीच दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेला आहे.
दोन्ही संघाना विजय महत्त्वाचा
ग्रुप 2 मध्ये असणाऱ्या भारत आणि न्यूझीलंड या दोन्ही संघाना पाकिस्तानने पहिल्या सामन्यात पराभूत केलं आहे. त्यामुळे आता आगामी सामन्यात विजय मिळवण्यासाठी दोन्ही संघ जीवाचं रान कऱणार हे नक्की. स्पर्धेत टिकून राहण्यासाठी हा विजय दोन्ही संघासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. सध्या पाकिस्तान पहिल्या स्थानी तर अफगाणिस्तान दुसऱ्या स्थानी असून भारत आणि न्यूझीलंड हे संघ विजयी आणि चांगल्या रनरेटने गुणतालिकेत पुढे जाण्यासाठी प्रयत्न करणार आहेत.
भारताचा पुढील सामना कधी?
भारत आणि न्यूझीलंड हा सामना रविवारी अर्थात 31 ऑक्टोबर रोजी दुबईच्या आंतरराष्ट्रीय मैदानावर खेळवला जाणार आहे. भारतीय प्रमाणवेळेनुसार हा सामना सायंकाळी 7 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. तर 7 वाजता नाणेफेक होणार आहे.
भारत असणाऱ्या ग्रुपची स्थिती काय?
सुपर 12 चे दोन ग्रुप असून ग्रुप 2 मध्ये भारत, पाकिस्तान, न्यूझीलंड, अफगाणिस्तान, स्कॉटलंड आणि नामिबीया हे संघ आहेत. यामध्ये पाकने भारत आणि न्यूझीलंड या दोघांना मात देत अव्वल स्थान गाठलं आहे. त्यांच्या खात्यात 4 गुण आहेत. तर अफगाणिस्तानने स्कॉटलंडला मात दिल्यामुळे ते 2 गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहेत. नामिबीया संघाने एकही सामना खेळला नसल्याने ते तिसऱ्या स्थानावर असून त्यानंतर न्यूझीलंड, भारत आणि स्कॉटलंड हे संघ एक-एक पराभव स्वीकारुन चौथ्या, पाचव्या आणि सहाव्या स्थानावर आहेत.
सविस्तर गुणतालिका पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा.
हे ही वाचा
सय्यद मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेपूर्वीच मुंबई संघावर संकट, संघातील 4 खेळाडू कोरोनाबाधित
T20 World Cup: महत्त्वाच्या सामन्याआधी आफ्रिकेच्या डिकॉकची सामन्यातून माघार, कारण ऐकून थक्क व्हाल!
(New zealands Martin Guptill may not play against india due to injury)