IPL 2023 मध्ये ज्याला कोणीच विकत घेतले नाही त्याने ठोकल्या आता 245 धावा
IPL 2023 मध्ये खेळण्याची त्याची इच्छा होती. पण त्याला कोणत्याच संघाने विकत घेतले नाही. पण आता द्विशतक ठोकलं.
मुंबई : भारतात सध्या आयपीएल 2023 ची धूम सुरू आहे. आयपीएलमध्ये अनेक खेळाडू चांगली कामगिरी करत आहेत. पण असेही काही खेळाडू आहेत ज्यांना खेळण्याची संधी मिळाली नाही. आयपीएलमध्ये ज्याला कोणत्याच संघाने विकत घेतले नाही. त्या खेळाडूने आता मोठी खेळी केली आहे. श्रीलंकेत कसोटी मालिका सुरु आहे. श्रीलंका आणि आयर्लंड यांच्यात दुसऱ्या कसोटी दरम्यान दोन फलंदाजांनी आश्चर्यकारक कामगिरी केली आहे. श्रीलंकेचा फलंदाज कुसल मेंडिस आणि निशान मदुष्का यांनी शानदार द्विशतक ठोकले आहे. मदुष्काने 205 धावांची तर कुसल मेंडिसने 291 चेंडूत 245 धावांची खेळी केलीये.
दुहेरी शतक
कुसल मेंडिसने कसोटीत सामन्यात जोरदार फटकेबाजी करत दुहेरी शतक ठोकलं आहे. यावेळी त्याचा स्ट्राईक रेट 84.19 होता. या इनिंगमध्ये त्याने 29 चौकार मारल्या. मेंडिसने 11 षटकार आणि 18 चौकार मारले.
आयपीएलमध्ये घेतलं नाही
कुसल मेंडिसला आयपीएल 2023 मध्ये खेळायचे होते, तो लिलावात सहभागी ही झाला होता. मात्र, कोणत्याही संघाने मेंडिसवर बोली लावली नाही. मेंडिसची मूळ किंमत 50 लाख रुपये होती. आता मेंडिसने गॅलेमध्ये अप्रतिम द्विशतक झळकावून आपली प्रतिभा सिद्ध केली आहे. कुसल मेंडिसनेही पहिल्या कसोटीत शतक झळकावले होते. त्याने 193 चेंडूत 140 धावा काढल्या होत्या.
दुहेरी शतक ठोकत रचला इतिहास
कुसल मेंडिससोबत श्रीलंकेचा युवा सलामीवीर निशान मदुष्कानेही इतिहास रचला. या 23 वर्षीय फलंदाजाने 339 चेंडूत 205 धावा ठोकल्या. मदुष्काच्या बॅटने कसोटी क्रिकेटमध्ये प्रथमच शतक झळकावले आणि त्याचे दुहेरी शतकात रूपांतर केले. हा पराक्रम करणारा मदुष्का हा श्रीलंकेचा दुसरा फलंदाज ठरला आहे. 1987 मध्ये ब्रँडन कुरुप्पूने असाच एक पराक्रम केला होता.
अँजेलो मॅथ्यूज-दिमुथ करुणारत्ने यांनीही शानदार शतक झळकावले. कर्णधार करुणारत्ने याने 115 धावांची खेळी केली. बातमी लिहीपर्यंत अँजेलो मॅथ्यूजने नाबाद 100 धावा केल्या होत्या. श्रीलंकेची धावसंख्याही 700 च्या पुढे गेली होती.