टीम इंडियात पावर सेंटर शिफ्ट होतय, रोहित-विराटचा जमाना गेला, आकडेच सगळं काही सांगून जातायत
क्रिकेट खेळणाऱ्या कुठल्याही टीमसाठी मधली फळी बळकट असणं, आवश्यक असतं. आता भारतीय संघाची (Team india) मधली फळी हळूहळू आकाराला येत आहे. फॉर्मेट कुठलाही असो, टेस्ट, (Test) वनडे (ODI) किंवा टी 20. आता दोन-तीन विकेट पडल्यानंतर खऱ्याअर्थाने संघाची फलंदाजी सुरु होतेय.
मुंबई: क्रिकेट खेळणाऱ्या कुठल्याही टीमसाठी मधली फळी बळकट असणं, आवश्यक असतं. आता भारतीय संघाची (Team india) मधली फळी हळूहळू आकाराला येत आहे. फॉर्मेट कुठलाही असो, टेस्ट, (Test) वनडे (ODI) किंवा टी 20. आता दोन-तीन विकेट पडल्यानंतर खऱ्याअर्थाने संघाची फलंदाजी सुरु होतेय. इंग्लंडमध्ये तिन्ही फॉर्मेट मध्ये एकूण सात सामने झाले. त्यातून तरी असेच संकेत मिळत आहेत. याआधी ऑस्ट्रेलिया दौरा आणि देशांतर्गत मालिकेतही हेच दिसलं होतं. लोकांच्या दृष्टीकोनातून सोशल मीडियावर रोहित शर्मा आणि विराट कोहली आजही मोठे क्रिकेटपटू आहेत. पण प्रत्यक्ष जमिनीवर चित्र बदलतय. आता ऋषभ पंत आणि हार्दिक पंड्याच टाइम येतोय. आपण या बद्दल अधिक जाणून घेऊया.
टॉप 3 कोण होते?
2019 पर्यंतचा परफॉर्मन्स बघितला, तर भारताचं पावर सेंटर टॉप ऑर्डरच्या फलंदाजांकडे होतं. वनडे आणि टी 20 मध्ये रोहित शर्मा आणि शिखर धवनची जोडी होती. तिसऱ्या क्रमांकावर विराट कोहली यायचा. भारताच्या 60 टक्के सामन्यांमध्ये या तिघांपैकी एक जण मोठी खेळी खेळायचा. पण 2020 च्या सुरुवातीला स्थिती बदलली. वनडे क्रिकेट मध्ये टॉप 3 पोजिशनसाठी 11 खेळाडू आजमवण्यात आले. यात विराट, रोहित आणि धवनही होते. या दरम्यान भारताकडून 24 वनडे सामन्यात टॉप 3 कडून फक्त एक शतक झळकवण्यात आलं. यावर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर मध्ये ऑस्ट्रेलियात टी 20 वर्ल्ड कप होणार आहे. टी 20 फॉर्मेट मध्येही टॉप 3 ने चांगली कामगिरी केलेली नाही. जानेवारी 2020 पासून आतापर्यंत भारताकडून रोहित, विराट आणि धवनसह एकूण 15 फलंदाजांनी टॉप 3 मध्ये फलंदाजी केली. त्यांनी 33 च्या सरासरीने धावा केल्या. तेच पाकिस्तानच्या टॉप 3 ने 40 च्या सरासरीने धावा बनवल्या.
मिडल ऑर्डरमुळे भारत जिंकतोय सामने
विराट, धवन आणि रोहित सारखे दिग्गज फलंदाज फेल होऊनही भारत सामने जिंकतोय. कारण एक्स्ट्रा लोड मधली फळी उचलतेय. जानेवारी 2020 पासून आतापर्यंत 24 वनडे सामन्यात भारताकडून चौथ्या ते सातव्या नंबरच्या फलंदाजांनी मिळून 44.91 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
टी 20 मध्येही हीच परिस्थिती आहे. चौथ्या ते सातव्या नंबरच्या फलंदाजांनी 2020 पासून 43 सामन्यात 31 च्या सरासरीने धावा केल्या आहेत.
पंत तारणहार, हार्दिकच्या कामगिरीत सातत्य
ऋषभ पंत मागच्या एक वर्षात तिन्ही फॉर्मेट मधला टीम इंडियाचा सर्वोत्तम फलंदाज ठरला आहे. इंग्लंड दौऱ्यात एजबॅस्टन कसोटीत त्याने शानदार शतक झळकावलं. मँचेस्टर मध्ये शेवटच्या वनडेतही त्याने तुफानी शतकी खेळी साकारली. पंतने 1 जुलै 2021 पासून आतापर्यंत 36 आंतरराष्ट्रीय सामन्यात 1,287 धावा केल्या आहेत. यात तीन शतकं आहेत. रोहित शर्माने 29 सामन्यात 1,144 धावा केल्या आहेत. तो दुसऱ्या स्थानावर आहे. पण त्याने मागच्या टी 20 वर्ल्ड कपपासून विशेष अशी कमाल दाखवलेली नाही.
विराट कोहलीने 27 सामन्यात फक्त 851 धावा केल्या आहेत. यात 7 अर्धशतकांचा समावेश आहे. पण शतक एकही नाहीय. मागच्या तीन वर्षात त्याने एक शतक झळकावलेलं नाही.
रोहित-विराटकडे अजून दोन ते तीन महिने
हार्दिक पंड्याने अजून टेस्ट मध्ये खेळत नाही. पण मागच्यावर्षभरात त्याने 21 सामन्यात 415 धावा केल्या आहेत. त्याशिवाय 15 विकेटही घेतल्या आहेत. पंत आणि पंड्या दोघे आयपीएल संघाचे कॅप्टन आहेत. हार्दिकने पहिल्याच प्रयत्नात गुजरात टायटन्सला आयपीएलचं विजेतेपद मिळवून दिलं. त्याने कॅप्टन म्हणून पहिल्याच सीजनमध्ये नेतृत्व कौशल्य दाखवलं. रोहित शर्मा आता 35 वर्षांचा आहे. विराट कोहली नोव्हेंबर मध्ये 34 वर्षांचा होईल. म्हणजे करीयरमधली त्यांची अखेरची काही वर्ष उरली आहेत. पुढच्या दोन-तीन महिन्यात या दोन्ही खेळाडूंनी लौकीकाला साजेसा खेळ केला नाही, पंड्या आणि ऋषभ सारखे खेळाडू लोकांच्या दृष्टीकोनातून आणखी मोठे होतील.