IND vs ENG: ‘आता तो शार्दुल…’ संजय मांजरेकरांचं शार्दुल ठाकूरबद्दल मोठं विधान
IND vs ENG: भारताने काल 15 वर्षानतंर इंग्लंड मध्ये कसोटी मालिका जिंकण्याची (IND vs ENG) संधी दवडली. इंग्लंडने एजबॅस्टन कसोटी जिंकून मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली.
मुंबई: भारताने काल 15 वर्षानतंर इंग्लंड मध्ये कसोटी मालिका जिंकण्याची (IND vs ENG) संधी दवडली. इंग्लंडने एजबॅस्टन कसोटी जिंकून मालिकेत 2-2 अशी बरोबरी साधली. खरंतर हा कसोटी सामना (Test Match) मागच्यावर्षीच होणार होता. पण कोविडमुळे त्यावेळी ही कसोटी रद्द झाली होती. भारताने मालिकेतील या पाचव्या अखेरच्या कसोटी सामन्यात पहिले तीन दिवस वर्चस्व गाजवलं. पण शेवटच्या दोन दिवसातला खराब खेळ महाग पडला. भारताने इंग्लंडला विजयासाठी सोपं लक्ष्य दिलं नव्हतं. तब्बल 378 धावांच डोंगराएवढ आव्हान दिलं होतं. पण इंग्लिश फलंदाजांनी कमालीचा खेळ दाखवला. फक्त 3 विकेट गमावून त्यांनी हे लक्ष्य पार केलं. इंग्लंडच्या या विजयाला भारतीय गोलंदाजांनीही हातभार लावला. त्यांनी स्वैर मारा केला, ज्याचा जॉनी बेयरस्टो (Jonny Baristow) आणि ज्यो रुट या फलंदाजांनी पुरेपूर फायदा उचलला.
दुसऱ्या इनिंगमध्ये मोहम्मद सिराज फ्लॉप
पराभवानंतर भारतीय गोलंदाजांच्या कामगिरीचं विश्लेषण झालं. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी यांनी नेहमीप्रमाणे उत्तम गोलंदाजी केली. पण मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकूर या दोघांनी निराश केलं. सिराजने पहिल्या डावात भारताकडून सर्वाधिक चार विकेट घेतल्या होत्या. पण दुसऱ्याडावात त्याला एकही विकेट घेणं जमलं नाही, तसंच तो धावा सुद्धा रोखू शकला नाही.
संजय मांजरेकर काय म्हणाले?
पहिल्याडावात शार्दुल ठाकूरने 7 षटकात 48 धावा दिल्या. फक्त एक विकेट घेतला. दुसऱ्याडावात शार्दुलने 11 षटकात 65 धावा दिल्या. त्यांच्या गोलंदाजीवर इंग्लिश फलंदाजांनी चौफेर फटकेबाजी केली. माजी क्रिकेटपटू आणि क्रिकेट विश्लेषक संजय मांजरेकर यांनी शार्दुलच्या गोलंदाजीबद्दल एक मोठं विधान केलं आहे. शार्दुलच्या गोलंदाजीत घसरण झाली असून आधी जशी तो बॉलिंग करायचा, तशी गोलंदाजी तो आता करत नाही, असं संजय मांजरेकर म्हणाले. “18 महिने आधी कसोटी क्रिकेट मध्ये ज्या शार्दुल ठाकूरला पाहिलं होतं, तसा गोलंदाज आता तो राहिलेला नाही” असं संजय मांजरेकर सोनी वाहिनीवरील एक्स्ट्रा इनिंग्स कार्यक्रमात म्हणाले.
शार्दुलच्या निवडीवरुन वादविवादाला जागा
रविचंद्रन अश्विनला बसवून चौथा वेगवान गोलंदाज म्हणून शार्दुल ठाकूरचा संघात समावेश करण्यात आला होता. त्यामुळे त्याच्या निवडीवरुन वादविवादाला जागा आहे. फलंदाजी करण्याची त्याची क्षमता हे शार्दुल ठाकूरच्या निवडीमागच मुख्य कारण आहे. पण बॅटने ही तो विशेष काही करु शकला नाही. पहिल्या इनिंगमध्ये 1 आणि दुसऱ्याडावात 4 धावांवर आऊट झाला.