Virat kohli ला बेईमान म्हणणाऱ्याने स्वत: तोडला कायदा, जाणून घ्या नुरुल हसनच 5 रन्सच सत्य
T20 World cup 2022 मध्ये नुरुल हसनच्या बेईमानीमुळे बांग्लादेशची टीम हरता-हरता वाचलीय
एडिलेड: टीम इंडियाने T20 वर्ल्ड कप 2022 मध्ये आपला तिसरा विजय नोंदवला. सुपर-12 च्या सामन्यात टीम इंडियाने बांग्लादेशला 5 धावांनी हरवलं. या सामन्यानंतर बांग्लादेशच्या खेळाडूंनी हताश होणं स्वाभाविक आहे. बांग्लादेशचा विकेटकीपर नुरुल हसनने सामन्यानंतर एक आरोप केलाय. त्यामुळे सगळ्यांचा धक्का बसलाय. त्याने विराट कोहलीवर चीटिंगचा आरोप केलाय. बांग्लादेशच्या इनिंगमध्ये 7 व्या ओव्हरमध्ये विराट कोहलीने फेक फिल्डिंग केली, असा आरोप नुरुल हसनने केलाय. अंपायरला विराटवर लक्ष ठेवता आलं नाही, असं त्याचं म्हणणं आहे.
विराटवर आरोप करणाऱ्या नुरुलने स्वत: काय केलं?
अंपायरने विराटला पकडलं असतं, तर बांग्लादेशला पेनल्टी म्हणून 5 रन्स मिळाले असते आणि निकाल वेगळा दिसला असता, असं नुरुलच म्हणणं आहे. नुरुल हसनच्या या आरोपावर टीम इंडियाकडून कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही. पण वेगळी बाब म्हणजे विराटवर आरोप करणाऱ्या या खेळाडूने स्वत: दोनदा नियम मोडला आहे. त्याची किंमत बांग्लादेशच्या टीमला चुकवावी लागली आहे.
नुरूल हसनने स्वत: मोडला नियम
नुरुल हसनने टी 20 वर्ल्ड कप 2022 मध्ये दोनदा नियम मोडलाय. त्यामुळे एकदा बांग्लादेशची टीम हरता-हरता वाचली आहे. नुरुल हसनने आधी दक्षिण आफ्रिका आणि नंतर झिम्बाब्वे विरुद्ध नियम मोडला. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध नुरुलने शाकीब अल हसनच्या गोलंदाजीवर विकेटकीपिंग करताना पोजिशन चेंज केली होती. त्यामुळे बांग्लादेशच्या टीमवर 5 रन्सची पेनल्टी लागली होती.
झिम्बाब्वे विरुद्ध नुरुल हसनमुळे बांग्लादेशची टीम हरली असती
झिम्बाब्वे विरुद्धही नुरुल हसनने अशीच कृती केली होती. त्यामुळे बांग्लादेशची टीम पराभवाच्या छायेत होती. झिम्बाब्वे विरुद्ध बांग्लादेशला शेवटच्या चेंडूवर 5 धावांचा बचाव करायचा होता. मोसाद्देक हुसैनच्या शेवटच्या चेंडूवर ब्लेसिंग मुजरबानी शॉट खेळताना चुकला. यावेळी विकेटकीपर हसनने चेंडू पकडून स्टम्प उडवला.
बांग्लादेशच्या टीमने विजयाचं सेलिब्रेशन सुरु केलं. त्यावेळी तिसऱ्या अंपायरने पाहिलं की, नुरुल हसनने चेंडू विकेटच्या पुढे पकडलाय. त्यामुळे तो चेंडू नो बॉल देण्यात आला. त्यावेळी बांग्लादेशच्या टीमवर पराभवाच सावट होतं. झिम्बाब्वेचा ब्लेसिंग मुजरबानी शेवटच्या चेंडूवर चौकार मारु शकला नाही. त्यामुळे बांग्लादेशची टीम 3 रन्सनी जिंकली.