NZ vs ENG Test : ब्रॉड-अँडरसनच्या वादाळात न्यूझीलंड उद्धवस्त, इंग्लंडने 4 दिवसात संपवली पहिली टेस्ट मॅच
NZ vs ENG 1st Test : न्यूझीलंडची टीम टार्गेटपासून दूर राहिली. न्यूझीलंडचा पराभव करुन इंग्लंडच्या टीमने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंडमधील कसोटी सामन्याचा निकाल चौथ्या दिवशीच लागला.
NZ vs ENG 1st Test : घरचं मैदान, आपला देश मात्र, तरीही न्यूझीलंडला पराभवाचा सामना करावा लागला. इंग्लंडने टेस्ट सीरीजच्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचा बँड वाजवला. हा डे-नाईट कसोटी सामना होता. इंग्लंडने न्यूझीलंडसमोर विजयासाठी 394 धावांच टार्गेट ठेवलं होतं. पण न्यूझीलंडची टीम टार्गेटपासून दूर राहिली. न्यूझीलंडचा पराभव करुन इंग्लंडच्या टीमने मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. इंग्लंड आणि न्यूझीलंडमधील कसोटी सामन्याचा निकाल चौथ्या दिवशीच लागला. इंग्लंडने न्यूझीलंडच्या टीमला थोड्या थोडक्या नव्हे तब्बल 267 धावांच्या फरकाने हरवलं. लक्ष्याचा पाठलाग करताना न्यूझीलंडचा डाव 126 धावात आटोपला.
पहिल्या डावात सर्वाधिक धावा कोणी केल्या?
16 फेब्रुवारीपासून हा कसोटी सामना सुरु झाला होता. गुलाबी चेंडूने खेळल्या जाणाऱ्या या टेस्ट मॅचमध्ये इंग्लंडच्या टीमने पहिली बॅटिंग केली. त्यांनी पहिल्या इनिंगमध्ये 9 विकेट गमावून 325 धावा केल्या. पहिल्या डावात इंग्लंडकडून हॅरी ब्रुकरने सर्वाधिक 89 आणि बेन डकेटने 84 रन्स केल्या.
पहिल्या डावात न्यूजीलंडची चांगली लढत
पहिल्या डावात न्यूझीलंडची सुरुवात खूपच खराब होती. फक्त 31 धावात त्यांनी 3 विकेट गमावल्या होत्या. टॉप फोर बॅट्समनमध्ये फक्त डवेन कॉनवेने दुहेरी धावसंख्या गाठली. त्याने 77 रन्स केल्या. त्याशिवाय मधल्याफळीतील विकेटकीपर बॅट्समन टॉम ब्लंडेलने शतक ठोकलं. त्याने 138 धावा केल्या. न्यूझीलंड टीमने पहिल्या इनिंगमध्ये 306 धावा केल्या. इंग्लंडकडून ओली रॉबिन्सनने सर्वाधिक 4 विकेट आणि अँडरसनने 3 विकेट घेतल्या.
394 धावांच टार्गेट
इंग्लंडकडे दुसऱ्याडावात 19 धावांची निसटती आघाडी होती. दुसऱ्याडावात इंग्लिश टीमने 374 धावा केल्या. इंग्लंडकडून दुसऱ्याडावातही हॅरी ब्रुकने सर्वाधिक धावा केल्या. त्याने 54 रन्स केल्या. विकेटकीपर बॅट्समन बेन फोक्सने 51 धावा फटकावल्या. ओली पोपने 49 रन्स केल्या. दुसऱ्याडावातील धावा आणि पहिल्या डावातील आघाडी या बळावर इंग्लंडने न्यूझीलंडला 394 धावांच टार्गेट दिलं. ब्रॉड-अँडरसनसमोर शरणागती
दुसऱ्याडावात ब्रॉड आणि अँडरसनच्या भेदक गोलंदाजीसमोर न्यूझीलंडच्या बॅट्समन्सचा निभाव लागला नाही. 100 धावात न्यूझीलंडचे 9 फलंदाज तंबूत परतले. शेवटच्या विकेटसाठी टिकनर आणि डॅरिल मिचेलमध्ये भागीदारी झाली. त्यामुळे न्यूझीलंडच्या टीमला सव्वाशे धावांचा टप्पा गाठता आला. दुसऱ्याडावात इंग्लंडकडून जेम्स अँडरसन आणि स्टुअर्ट ब्रॉडने 4-4 विकेट घेतल्या.