काखेतल्या घामावरुन ट्रोल करणाऱ्याला Mithali Raj ने दिलं होतं सडेतोड उत्तर
Mithali Raj Retirement: मिताली राज शांत, संयमी स्वभावाची असली, तरी तिने कधी चुकीच्या गोष्टी खपवून घेतल्या नाहीत. त्यामुळे काही वाद तिच्याशी जोडले गेले.
मुंबई: भारताची अव्वल महिला क्रिकेटपटू Mithali Raj आज आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाली. क्रिकेटच्या मैदानावर आपल्या कामगिरीने मितालीने अनेक विक्रम आपल्या नावावर केले. मिताली राज शांत, संयमी स्वभावाची असली, तरी तिने कधी चुकीच्या गोष्टी खपवून घेतल्या नाहीत. त्यामुळे काही वाद तिच्याशी जोडले गेले. सोशल मीडियावर (Social Media) युजर्स नेहमीच व्यक्त होत असतात. काही वेळा या व्यक्त होण्याला अजिबात अर्थ नसतो. आपल्याला वाटेल, तो अर्थ काढून समोरच्याला ट्रोल (Troll) केलं जातं. समोरची व्यक्ती कोण आहे? किती मोठं उत्तुंग व्यक्तीमत्व आहे? आपल्या क्षेत्रात त्या व्यक्तीने काय केलेय, याचा कुठलाही सारासार विचार न करता ट्रोल केलं जातं. मिताली यशस्वी क्रिकेटपटू असण्याबरोबरच सोशल मीडियावरही ती तितकीच सक्रीय होती. इन्स्टाग्राम, फेसबुक, टि्वटर या तिन्ही सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर तिला मानणारा मोठा वर्ग आहे. तिच्या फॉलोअर्सची मोठी संख्या आहे. मात्र तरीही मितालीला ट्रोलिंगचा सामना करावा लागला.
What a momentous day today was, standing with these special women!!@MabenMaben @AlNooshin @vedakmurthy08 pic.twitter.com/EsNwRN2G7N
— Mithali Raj (@M_Raj03) August 20, 2017
खिल्ली उडवणारी कमेंट
ही घटना पाच वर्षापूर्वीची म्हणजे 2017 मधली आहे. मितालीने एक फोटो पोस्ट केला होता. या फोटोत वेदा कृष्णमुर्ती, माजी क्रिकेटपटू नुशीन अल खादीर आणि ममता माबेन तिच्यासोबत होत्या. “आज खूप महत्त्वाचा दिवस आहे. या विशेष महिलांसोबत मी उभी आहे”, असं मितालीने त्या फोटोला कॅप्शन दिलं होतं. या फोटोत मितालीने परिधान केलेल्या ड्रेसवर बाहेर असलेल्या उष्णतेमुळे घाम दिसत होता. त्यावरुन एका टि्वटर युजरने विचित्र खिल्ली उडवणारी कमेंट केली होती.
I m where I m because I sweated it out on d field! I see no reason 2 b ashamed f it, when I’m on d ground inaugerating a cricket academy. https://t.co/lC5BOMf7o2
— Mithali Raj (@M_Raj03) August 20, 2017
चाहत्यांनी केलं होतं मितालीचं कौतुक
मितालीने त्या टि्वटर युजरला लगेच सडेतोड उत्तर दिलं होतं. “मी मैदानावर त्यावेळी घाम गाळला म्हणून आज मी इथे आहे. क्रिकेट अकादमीच उद्घाटन करण्यासाठी मैदानावर असताना, मला याची अजिबात लाज वाटत नाही” असं मितालीने आपल्या टि्वटमध्ये म्हटलं होतं. मितालीने दिलेल्या या उत्तराबद्दल तिच्या अनेक चाहत्यांनी तिचं कौतुकही केलं होतं.