PAK vs ENG Test Match: पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने अखेर दु:ख बोलून दाखवलं, म्हणाला…
इंग्लंडने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना जिंकत 1-0 ने आघाडी घेतली आहे. इंग्लंडने पहिल्याच सामन्यात पाकिस्तान दणका दिला आहे. पाकिस्तानला तिसऱ्या आणि चौथ्या दिवशी डोकं वर काढूच दिलं नाही. एक डाव आणि 47 धावांनी विजय मिळवला. या सामन्यातील पराभवानंतर पाकिस्तानचा कर्णधार शान मसूदने आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
पाकिस्तानची कसोटी क्रिकेटमध्ये पराभवाची मालिका कायम आहे. एक एक करत संघ पाकिस्तानला पराभवाची धूळ चारत आहेत. घरच्या मैदानावरही विजय मिळवणं कठीण जात असल्याचं दिसत आहे. कसोटीत दुबळ्या समजल्या जाणाऱ्या बांग्लादेश संघानेही व्हाईटवॉश दिला होता. त्यातून सावरण्यासाठी मुल्तानची खेळपट्टी फलंदाजीसाठी पूरक करण्यात आली होती. मात्र या खेळपट्टीवरही पाकिस्तानचा घाम निघाला. इंग्लंडने पाकिस्तानला बरोबर कात्रीत पकडलं आणि डाव उलटवला. इंग्लंडने पाकिस्तानचा एक डाव आणि 47 धावांनी पराभव केला. या विजयासह इंग्लंडने तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-0 ने आघाडी घेतली आहे. इंग्लंडविरुद्धच्या पराभवानंतर पाकिस्तान संघावर सर्वच स्तरातून टीका होत आहे. पाकिस्तानी क्रीडारसिकांनी तर सोशल मीडियाच्या माध्यमातून संघावर बोचरी टीका केली आहे. दुसरीकडे, पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद हा देखील खिन्न असल्याचं दिसून आलं. पराभवानंतर त्याने आपल्या भावनांना मोकळी वाट करून दिली.
“आम्ही तिसऱ्या आणि चौथ्या दिवसाच्या खेळाबाबत बोललो, पण शेवटी हा सांघिक खेळ आहे, हे विसरून चालणार नाही. संघ म्हणून प्रत्येक गोष्टीचे फायदे आणि तोटे आहेत. जेव्हा 550 धावा करता तेव्हा 10 विकेट घेण्याचा बॅकअप असणं गरजेचं असते. 220हून अधिक धावांची आघाडी बरंच काही सांगून जाते. त्या 20 विकेट्स मिळवण्याचा मार्ग इंग्लंडला सापडला. आम्हाला हा मार्ग सापडायला हवा. मालिकेत पुढे जाताना आमच्यापुढे हे आव्हान असेल.”, असं शान मसूद सामन्यानंतर म्हणाला.
“आम्हाला संघाच्या मानसिकतेबाबत आणि सातत्यपूर्ण कामगिरीबाबत चर्चा करावी लागेल. खेळपट्टी कशी होती हा काही विषय नाही, आम्हाला बाद करण्याचा मार्ग शोधायला हवा होता. इंग्लंडने ते करून दाखवलं. कधी कधी काही गोष्टी तुमच्या बाजूने घडत असतात, कधी या उलट होतं. कसोटी क्रिकेटमध्ये सातत्यपूर्ण कामगिरी करणं आवश्यक आहे. आम्हाला खेळायला आवडतं पण या निकालामुळे आम्ही दु:खी झालो आहोत. एक राष्ट्र म्हणून दुखावलो आहोत. जबाबदारीपासून पळण्याचा आम्ही प्रयत्न करत नाहीत. पण पाकिस्तान क्रिकेट संघाला अपेक्षित निकाल मिळत. आम्ही त्यासाठी प्रयत्न करत आहोत.”, असंही पाकिस्तानचा कर्णधार शान मसूद याने सांगितलं.