पाकिस्तानी क्रिकेटपटू शोएबचा आत्महत्येचा प्रयत्न, हाताची नस घेतली कापून
देशाकडून क्रिकेट (Cricket) खेळण्याची संधी मिळावी, ही प्रत्येक क्रिकेटपटूची इच्छा असते. पण त्या टप्प्याला पोहोचण्याआधी अनेक परीक्षा द्याव्या लागतात.
मुंबई: देशाकडून क्रिकेट (Cricket) खेळण्याची संधी मिळावी, ही प्रत्येक क्रिकेटपटूची इच्छा असते. पण त्या टप्प्याला पोहोचण्याआधी अनेक परीक्षा द्याव्या लागतात. काही वेळा अपयशही हाती लागतं. पाकिस्तानातील (Pakistan) अशाच एका क्रिकेटपटूला अपयश पचवता आलं नाही. त्याने स्वत:ला संपवण्याचा प्रयत्न केला. पाकिस्तानातील सिंध प्रांतातील एका वेगवान गोलंदाजाने संघात निवड झाली नाही, म्हणून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. या क्रिकेटपटूचं नाव आहे शोएब. (shoaib) पाकिस्तानी क्रिकेट बोर्डाच्या इंटर सिटी चॅम्पियनशिप स्पर्धेत शोएबची निवड झाली नाही. म्हणून त्याने हे टोकाच पाऊल उचललं. डिप्रेशन मध्ये येऊन त्याने हाताची नस कापून घेतली.
खोलीत कोंडून घेतलं होतं
शोएबला मंगळवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. कोचने इंटरसिटी ट्रायलसाठी शोएबला बोलावल नाही. म्हणून तो डिप्रेशनमध्ये गेला, असं कुटुंबातील सदस्यांनी सांगितलं. शोएबने स्वत:ला एका खोलीत कोंडून घेतलं होतं.
प्रकृती गंभीर
“शोएब आम्हाला बाथरुम मध्ये दिसला. त्याने हाताची नस कापून घेतली होती. बेशुद्धावस्थेत होता. आम्ही त्याला लगेच रुग्णालयात घेऊन गेलो. त्याची प्रकृती गंभीर आहे” असं नातेवाईकांनी सांगितलं. फेब्रुवारी 2018 मध्ये कराची मधील एका क्रिकेटपटूने सिटी अंडर 19 टीम मध्ये संधी मिळाली नाही, म्हणून आत्महत्या केली होती. मोहम्मद जारयाब या क्रिकेटपटूचं नाव आहे. त्याने घरातच गळफास घेऊन आत्महत्या केली.