Delhi Capitals ला दक्षिण आफ्रिकेत मिळाला ऋषभ पंतचा पर्याय, 163 च्या स्ट्राइक रेटने फटकेबाजी ‘
या बॅट्समनने विकेट पडत असताना, एकबाजू लावून धरली. तुफानी बॅटिंग करुन त्याने टीमला विशाल धावसंख्या उभारुन दिली. ऋषभ पंतचा पर्याय ठरु शकेल असा हा खेळाडू कोण आहे? जाणून घ्या त्याच्याबद्दल
डरबन: सध्या दिल्ली कॅपिटल्सची स्थिती खराब आहे. ऋषभ पंतच्या कारला झालेला अपघात हा त्यांच्यासाठी सर्वात मोठा झटका आहे. ऋषभ यंदाच्या IPL 2023 च्या सीजनमध्ये खेळू शकणार नाहीय. काही दिवसांपूर्वी पंतच्या कारला भीषण अपघात झाला होता. त्यात त्याला गंभीर दुखापत झाली. नुकतीच पंतवर शस्त्रक्रिया सुद्धा झालीय. त्यामुळे इतक्यात तो मैदानावर उतरण्याची शक्यता नाहीय. या परिस्थितीत दिल्लीसमोर पंतला पर्याय कोण? हा मोठा प्रश्न आहे. दिल्लीच्या टीमसाठी ही चिंतेची बाब आहे. कॅप्टनशिपसाठी दिल्लीकडे डेविड वॉर्नरच्या रुपात पर्याय आहे. पण दिल्लीला अशा विकेटकीपरचा शोध आहे, जो बॅटने सुद्धा धमाका करु शकतो. दिल्लीच्या टीमला असा खेळाडू मिळू शकतो, त्याच नाव आहे फिल सॉल्ट.
दक्षिण आफ्रिकेत कुठल्या टीमकडून खेळतोय?
फिल सॉल्ट सध्या दक्षिण आफ्रिकेत सुरु असलेल्या टी 20 लीगमध्ये खेळतोय. दिल्लीची फ्रेंचायजी प्रिटोरिया कॅपिटल्सचा तो भाग आहे. काल या टीमचा सनरायजर्स इस्टर्न कॅपबरोबर सामना झाला. त्यात फिल सॉल्टने आपल्या बॅटची ताकत दाखवून दिली. त्याच्यामुळे प्रिटोरिया कॅपिटल्सने 23 धावांनी विजय मिळवला.
163.82 च्या स्ट्राइक रेटने बनवल्या धावा
या सामन्यात कॅपिटल्सची टीम प्रथम बॅटिंग करण्यासाठी मैदानात उतरली होती. विल जॅक्सच्या रुपात त्यांनी आपला पहिला विकेट गमावला. मार्को जॅनसेनने त्याला आऊट केलं. कॅपिटल्सच्या टीमचे विकेट जाण्याचा सिलसिला कायम होता. एकाबाजूने टीमचे विकेट पडत असताना, फिल सॉल्टने दुसरी बाजू लावून धरली. राइल रुसो (4), थेयूनिस डी ब्रूनो (19), सेनुरन मुथुसामी (13) शेन डॅड्सवेल (0) हे लवकर पॅव्हेलियनमध्ये परतले. या दरम्यान सॉल्टने अर्धशतक झळकवलं. त्याने 47 चेंडूत 11 चौकार ठोकून 77 धावा फटकावल्या. त्याने एक षटकारही ठोकला.
फिल्ट सॉल्टला कोणाची साथ मिळाली?
फिल्ट सॉल्टला त्याच्या इनिंग दरम्यान जेम्स नीशमची साथ मिळाली. त्याने 28 चेंडूत चार चौकार आणि एका षटकाराच्या मदतीने 37 धावा केल्या. कॅप्टन व्यान पार्नेलने सुद्धा तुफानी अंदाज दाखवला. त्याने नऊ चेंडूत दोन चौकार आणि तीन षटकारांच्या मदतीने नाबाद 29 धावा फटकावल्या. या फलंदाजांच्या बळावर कॅपिटल्सने 6 विकेट गमावून 193 धावा केल्या. सनरायजर्सच्या टीमच काय चुकलं?
सनरायजर्स टीमसाठी लक्ष्य सोपं नव्हतं. 194 धावांच्या टार्गेटचा पाठलाग करताना टीमला चांगल्या सुरुवातीची अपेक्षा होती. अपेक्षित सुरुवात त्यांना मिळाली नाही. सारेल इर्वी एक रन्स करुन आऊट झाला. जॉर्डन कोवसने फक्त पाच धावा केल्या. कॅप्टन एडेन मार्करम सुद्धा 5 रन्सच्या पुढे जाऊ शकला नाही. दुसरा सलामीवीर जेजे स्मट्सने टीमला विजय मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्याने 51 चेंडूत 66 धावा केल्या. या इनिंग दरम्यान त्याने सहा चौकार आणि चार षटकार लगावले. ट्रिस्टन स्ट्ब्सने 11 चेंडूत 23 धावा केल्या. टॉम एबेलने 24 चेंडूत नाबाद 40 धावा केल्या. सनरायजर्सच्या टीमने निर्धारित 20 ओव्हर्समध्ये 170 धावा केल्या. कॅपिटल्सची टीम 23 रन्सनी विजयी ठरली.