R Ashwin : आर अश्विनची निर्णायक क्षणी विजयी खेळी, थेट विराटच्या विक्रमाशी बरोबरी
टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवीचंद्रन आश्विन (Ravichandran Ashwin) हा विजयाचा खऱ्या अर्थाने शिल्पकार ठरला.
ढाका : टीम इंडियाने बांगलादेश विरुद्धचा दुसरा कसोटी सामना (BAN vs IND) हा चौथ्या दिवशी 3 विकेट्सने जिंकला. टीम इंडियाने (Team India) तिसऱ्या दिवसखेर 4 महत्त्वाचे विकेट्स गमावले. तर चौथ्या दिवसाच्या सुरुवातीला निराशाजनक सुरुवात झाली. मात्र टीम इंडियाने अखेर हा सामना जिंकला. टीम इंडियाचा ऑलराऊंडर रवीचंद्रन आश्विन (Ravichandran Ashwin) हा विजयाचा खऱ्या अर्थाने शिल्पकार ठरला. आश्विनने विकेट्सही घेतल्या. तर निर्णायक क्षणी 42 धावांची नाबाद खेळी करत विजयापर्यंत पोहचवलं. आश्विनने यासह विराट कोहलीच्या (Virat Kohli) मोठ्या विक्रमाची बरोबरी केली आहे. (r ashwin become win 9th time man of the match award and equal virat kohli record ban vs ind 2nd test day 4)
आश्विनने पहिल्या डावात 4 विकेट्स घेतल्या तसेट 12 धावाही केल्या. तर दुसऱ्या डावातही 4 फलंदाजांना मैदानाबाहेरचा रस्ता दाखवला. तर 42 रन्सची महत्त्वपूर्ण आणि गेमचेंजर खेळी साकारली. आश्विनने श्रेयस अय्यरसह 8 व्या विकेट्ससाठी नाबाद विजयी 71 रन्सची पार्टनरशीप केली. आश्विनच्या या ऑलराउंड कामगिरीसाठी त्याला ‘मॅन ऑफ द मॅच’ म्हणून गौरवण्यात आलं.
आश्विनची कसोटी क्रिकेटमध्ये मॅन ऑफ द मॅच जिंकण्याची ही 9वी वेळ ठरली. यासह आश्विनने विराटच्या विक्रमाची बरोबरी केली. विराटनेही टेस्ट क्रिकेटमध्ये 9 वेळा सामनावीर पुरस्कार जिंकला आहे. विराट आणि आश्विन हे दोघे सर्वाधिक वेळा ‘मॅन ऑफ द मॅच’चा बहुमान पटकावण्याच्या बाबतीत भारतीयांमध्ये संयुक्तरित्या चौथ्या स्थानी आहेत.
पहिल्या स्थानी कोण?
टीम इंडियासाठी कसोटीत सर्वाधिक मॅन ऑफ द मॅच होण्याचा बहुमान आणि रेकॉर्ड हा सचिन तेंडुलकरच्या नावे आहे. सचिनने हा कारनामा 14 वेळा केला आहे. दुसऱ्या स्थानी राहुल द्रविड (11) आणि तिसऱ्या स्थानी अनिल कुंबळे (10) विराजमान आहे.
अश्विन 3 हजारी मनसबदारी
अश्विनने टीम इंडियाला विजय मिळवून दिला. यासह आश्विनने कसोटी कारकिर्दीतील 3हजार धावांचा टप्पाही पार केला. आश्विनने आतापर्यंत 88 टेस्टमध्ये 3 हजार 43 धावा केल्या आहेत. यामध्ये 13 अर्धशतकं आणि 5 शानदार शतकांचा समावेश आहे.
दरम्यान बांगलादेश दौऱ्यानंतर टीम इंडियासमोर श्रीलंकेचं आव्हान असणार आहे. श्रीलंका भारत दौऱ्यावर येत आहे. श्रीलंकेच्या या दौऱ्याला 3 जानेवारीपासून सुरुवात होत आहे. उभयसंघात टी 20 आणि एकदिवसीय मालिका खेळवण्यात येणार आहे.