26 फोर, 3 Six मुंबईच्या खेळाडूने जबरदस्त धुतलं, थेट ठोकली डबल सेंच्युरी
खराब फॉर्ममुळे टीम इंडियाच्या बाहेर गेलेल्या मुंबईच्या 'या' खेळाडूने डबल सेंच्युरी ठोकून खळबळ उडवून दिलीय.
मुंबई: रणजी ट्रॉफी 2022-23 मध्ये सर्फराज खानचा दमदार फॉर्म कायम आहे. हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात मुंबईकडून खेळताना सर्फराज खानने शानदार शतक ठोकलं. फर्स्ट क्लास करियरमधील त्याचं हे 11 व शतक आहे. शतकी इनिंगसोबतच सर्फराजने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये 3000 धावा पूर्ण केल्या आहेत. फर्स्ट क्लास करियरमध्ये सर्फराजने 3 हजार धावा अवघ्या 47 इनिंग्समध्ये पूर्ण केल्या. ही एक मोठी बाब आहे.
रहाणेची डबल सेंच्युरी
मुंबईचा कॅप्टन अजिंक्य रहाणेने या मॅचमध्ये डबल सेंच्युरी झळकवली. रहाणने 253 चेंडूंमध्ये द्विशतक झळकावलं. रहाणे 204 रन्सवर आऊट झाला. या खेळीत त्याने 26 चौकार आणि 3 षटकार लगावले. रहाणेच फर्स्ट क्लास करिअरमधील हे 37 व शतक आहे.
फर्स्ट क्लास क्रिकेटमधील रहाणेच चौथ द्विशतक
अजिंक्य रहाणेने फर्स्ट क्लास करिअरमधील हे चौथं द्विशतक झळकावलं आहे. याआधी रहाणेने फर्स्ट क्लास क्रिकेटमध्ये नॉर्थ झोन विरुद्ध वर्ष 2022 मध्ये 207 धावा केल्या होत्या. 2009 मध्ये हैदराबाद विरुद्ध 265 रन्सची इनिंग खेळला होता. 2008 मध्ये ओडिसा विरुद्ध रहाणेने 201 धावा फटकावल्या होत्या.
खराब फॉर्ममुळे रहाणे टीम बाहेर
जानेवारी 2022 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध अजिंक्य रहाणे शेवटचा कसोटी सामना खेळला होता. या कसोटीच्या दोन्ही इनिंगमध्ये त्याने एकूण 10 धावा केल्या होत्या. खराब फॉर्ममुळे अजिंक्य रहाणेला कसोटी संघाबाहेर करण्यात आलं.
ऑस्ट्रेलिया सीरीजसाठी निवड होणार?
रहाणेने डबल सेंच्युरी झळकवून कसोटी संघात निवड करण्यासाठी दावेदारी केली आहे. बांग्लादेश दौऱ्यानंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया विरुद्ध 4 कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे. निवड समिती सदस्यांना रहाणे फॉर्ममध्ये परतलाय असं वाटलं, तर त्याला कसोटी संघात स्थान मिळू शकतं.
ऑस्ट्रेलिया विरुद्ध कधी होईल मालिका?
भारत-ऑस्ट्रेलियामध्ये पहिला कसोटी सामना 9 ते 13 फेब्रुवारी दरम्यान नागपुरात खेळला जाईल. दुसरा कसोटी सामना 17 ते 21 फेब्रुवारी दरम्यान दिल्लीत होईल. तिसरा कसोटी सामना 1 ते 5 मार्च दरम्यान धर्मशाळा येथे होईल. चौथा कसोटी सामना 9 ते 13 मार्च दरम्यान अहमदाबाद येथे होईल.