Ranji Trophy 2022: अजिंक्य रहाणेचं दमदार शतक, श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी संघात निवड होणार?
मुंबईकर अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) रणजी करंडक (Ranji Trophy) स्पर्धेत दमदार शतक झळकावलं आहे. आजपासून रणजी सीजनला सुरुवात झाली आहे.
मुंबई: मुंबईकर अजिंक्य रहाणेने (Ajinkya Rahane) रणजी करंडक (Ranji Trophy) स्पर्धेत दमदार शतक झळकावलं आहे. आजपासून रणजी सीजनला सुरुवात झाली आहे. सौराष्ट्राविरुद्धच्या सामन्यात अजिंक्य रहाणेने शतकाला गवसणी घातली. अजिंक्य रहाणेचं प्रथमश्रेणीमधील हे 36 व शतक आहे. त्याने 212 चेंडूत शतक पूर्ण केलं. अहमदाबादच्या सरदार वल्लभभाई पटेल स्टेडियमवर मुंबई विरुद्ध सौराष्ट्र रणजी सामना (Mumbai vs Saurashtra) सुरु आहे. मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. मुंबई आणि सौराष्ट्रामधल्या या रणजी लढतीकडे देशभरातल्या मीडियाचे लक्ष आहे. कारण या सामन्यात अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे दोघे खेळत आहेत. आऊट ऑफ फॉर्म असलेल्या या दोघांचा आगामी श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत संघात समावेश होण्याची शक्यता कमी आहे. BCCI चे अध्यक्ष सौरव गांगुली यांनी दोघांना हरवलेला सूर शोधण्यासाठी रणजी कंरडक स्पर्धेत खेळण्याचा सल्ला दिला होता. रणजी मध्ये दमदार प्रदर्शन केल्यास निवड समितीकडून त्यांचा विचार होऊ शकतो.
सरफराझनेही झळकवल शतक
डावखुरा फिरकी गोलंदाज धर्मांद्रासिंह जाडेजाच्या गोलंदाजीवर षटकार ठोकून रहाणे 99 धावांवर पोहोचला. एक धाव काढून त्याने शतक पूर्ण केलं. रहाणेला मैदानात सरफराझ खानने साथ दिली. इथे फलंदाजी करणं सोप नव्हतं. पण रहाणेने आपल्या सर्व अनुभवाचा वापर करुन सौराष्ट्राच्या गोलंदाजांचा सामना केला. रहाणेने त्याच्या खेळीत 14 चौकार आणि दोन षटकार लगावले. सरफराझसोबत 150 धावांची भागीदारी केली. सरफराझने सुद्धा 191 चेंडूत शतक पूर्ण केलं. त्याने दोन षटकार आणि 11 चौकार लगावले.
???? ?? ?????! @ajinkyarahane88 opening the #RanjiTrophy2022 season with a fine half-century! ??
#SAUvMUM #CricketTwitter pic.twitter.com/m7PRKjvPOy
— KolkataKnightRiders (@KKRiders) February 17, 2022
अडचणीच असताना रहाणे बनला संकटमोचक
संघाचा डाव अडचणीत सापडलेला असताना अजिंक्य रहाणे आणि सरफराझ मुंबईसाठी संकटमोचक बनले. एकवेळ मुंबईची स्थिती तीन बाद 44 होती. कॅप्टन पृथ्वी शॉ (1), आकाश गोमेल (8) आणि सचिन यादव (19) स्वस्तात बाद झाले. पहिल्या 13 षटकात मुंबईच्या तीन विकेट गेल्या होत्या. अजिंक्य रहाणे आणि सरफराझने डाव संभाळत चांगले फटके लगावले. त्यामुळे सौराष्ट्रावर दबाव वाढला. सौराष्ट्राचे नेतृत्व जयदेव उनाडकटकडे आहे.
अजिंक्यवर मोठा दबाव अजिंक्य रहाणेसाठी हे शतक खूप महत्त्वाचं आहे. कारण त्याच्यावर मोठा दबाव आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील खराब कामगिरीमुळे त्याच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होतेय. संघातून त्याला बाहेर करण्याची मागणी होत आहे. अशा परिस्थितीत रहाणेने शतक झळकवलं आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेत रहाणेने सहा डावात फक्त 136 धावा केल्या होत्या. भारताने ही मालिका 2-1 अशी गमावली.
पहिल्या दिवसाचा खेळ
मुंबई – तीन बाद 263
अजिंक्य रहाणे – 108 नाबाद
सरफराज खान – 121 नाबाद