RR vs RCB Head to Head Records: फायनलच्या शर्यतीत कोण मारणार बाजी, मागच्या मॅचमधले आकडे काय सांगतात?
RR vs RCB Head to Head Records: राजस्थानचा संघ 2008 नंतर कधीही फायलनमध्ये पोहोचलेला नाही, तर आरसीबीचा संघ 2016 साली फायनलमध्ये पोहोचला होता. शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थानने आयपीएलचं पहिलं विजेतेपद मिळवलं होतं.
मुंबई: इंडियन प्रिमीयर लीगचा (IPL) 15 वा सीजन शेवटच्या टप्प्यात आहे. आता फक्त शेवटचे दोन सामने उरलेत. गुजरात टायटन्सचा (Gujarat Titans) संघ फायनलमध्ये पोहोचला आहे. फायनलमध्ये पोहोचणारी दुसरी टीम कुठली? त्याचा फैसला आज होईल. आयपीएल 2022 मध्ये क्वालिफायरचा दुसरा सामना आज खेळला जाणार आहे. राजस्थान रॉयल्स आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RR vs RCB) हे दोन संघ आमने-सामने असतील. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये ही मॅच खेळली जाणार आहे. रविवारी याच स्टेडियमवर फायनल मॅच होईल. राजस्थानने गुजरात विरुद्ध क्वालिफायर 1 चा सामना खेळला. पण ते यशस्वी ठरले नाहीत. बँगलोरने एलिमिनेटर राऊंडमध्ये लखनौ सुपर जायंट्सवर विजय मिळवला. बँगलोर आणि राजस्थान या दोन संघातील हेड टू हेडचे आकडे जाणून घेऊया.
राजस्थानचा संघ 2008 नंतर कधीही फायलनमध्ये पोहोचलेला नाही, तर आरसीबीचा संघ 2016 साली फायनलमध्ये पोहोचला होता. शेन वॉर्नच्या नेतृत्वाखाली राजस्थानने आयपीएलचं पहिलं विजेतेपद मिळवलं होतं. पण त्यानंतर हा संघ प्लेऑफमध्येही सहजासहजी पोहोचू शकला नाही. 2018 नंतर राजस्थानच्या टीमने पहिल्यांदाच प्लेऑफमध्ये जागा बनवलीय.
हेड टू हेड आकडे
आयपीएलच्या आतापर्यंतच्या सीजनमध्ये राजस्थान आणि बँगलोर या दोन संघांमध्ये 27 सामने झालेत. यात बँगलोरचं पारडं जड आहे. बँगलोरने राजस्थान विरुद्ध आतापर्यंत 13 सामने जिंकलेत, तर 11 मॅचेसमध्ये त्यांचा पराभव झाला आहे. तीन सामन्यांचा निकाल लागलेला नाही. आकड्याच्या दृष्टीने बँगलोरने राजस्थान विरुद्ध दोन सामने जास्त जिंकलेत. पण क्रिकेटमध्ये प्रत्येक सामना नवीन असतो.
मागच्या 5 सामन्यातील स्थिती काय?
दोन्ही संघात खेळल्या गेलेल्या पाच सामन्यांवर नजर टाकली, तर बँगलोरचीच बाजू वरचढ आहे. मागच्या पाच सामन्यांपैकी बँगलोरने राजस्थान विरुद्ध चार सामने जिंकलेत. या सीजनमध्ये दोन्ही संघांमध्ये दोन सामने झाले. त्यात एक बँगलोरने तर एक राजस्थानने जिंकला. 26 एप्रिलला खेळल्या गेलेल्या सामन्यात राजस्थानने 29 धावांनी विजय मिळवला होता. त्याआधी पाच एप्रिलच्या सामन्यात बँगलोरने राजस्थानावर चार विकेटने विजय मिळवला होता. 29 सप्टेंबर 2021, 22 एप्रिल 2021, 17 ऑक्टोबर 2020 रोजी खेळल्या गेलेल्या सामन्यात बँगलोरने विजय मिळवला होता.