IND vs AUS 3rd Test : इंदोरमध्ये सव्वादोन दिवसात टीम इंडिया कशी हरली? ‘ही’ आहेत पराभवाची 5 मोठी कारणं
IND vs AUS 3rd Test : अतिआत्मविश्वासामुळे टीम इंडियाचा घात झाला का? बॅटिंग-बॉलिंगशिवाय टीम इंडियाने आणखी एक मोठी चूक झाली.
IND vs AUS 3rd Test : इंदोरच्या टर्निंग पीचवर टीम इंडियाने सव्वादोन दिवसात ऑस्ट्रेलिया विरुद्ध कसोटी सामना गमावला. होळकर स्टेडियमवर टीम इंडिया आपल्याच जाळ्यात फसली. ऑस्ट्रेलियाच्या स्पिन बॉलर्सनी टर्निंग पीचचा पुरेपूर फायदा उचलला. टीम इंडियाची बॅटिंग लाइन अप दोन दिवसात कोसळली. इंदोरमध्ये टीम इंडियासोबत असं होईल, याची कोणी कल्पनाही केली नव्हती. कॅप्टन रोहित शर्मा, शुभमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, श्रेयस अय्यर, रवींद्र जाडेजा आणि केएस भरतमध्ये जणू पॅव्हेलियनमध्ये परतण्याची स्पर्धाच लागली होती. सीरीजमध्ये भारत 2-1 ने आघाडीवर आहे. चौथा कसोटी सामना 9 मार्चला अहमदाबादमध्ये खेळला जाईल.
टीम इंडियाच्या पराभवाची पाच कारणं
- ऑस्ट्रेलियाविरुद्ध इंदोर कसोटीत टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्माने टॉस जिंकून पहिली बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. टीम इंडियाच्या फलंदाजांना कॅप्टनचा विश्वास सार्थ ठरवता आला नाही. इंदोरची विकेट कशी असेल? त्यावर किती चेंडू टर्न होईल? याचा भारतीय फलंदाजांना अंदाजच बांधता आला नाही. इंदोर टेस्टमध्ये टीम इंडियाने पहिली गोलंदाजी स्वीकारली असती, तर ऑस्ट्रेलियाची बॅटिंग पाहून त्यांना टर्नचा अंदाज आला असता. नागपूर आणि दिल्ली दोन्ही कसोटीत टीम इंडियाने प्रथम गोलंदाजी करताना विजय मिळवला होता.
- इंदोर कसोटीत टीम इंडियाचा पहिला डाव 109 धावात आटोपला. पहिल्या डावातील खराब प्रदर्शनाने टीम इंडियाच्या पराभवाचा पाया रचला. पहिल्या इनिंगमध्ये टीम इंडियाकडून 22 धावा करणारा विराट कोहली टॉप स्कोरर होता. पहिल्या इनिंगमध्ये रोहित शर्मा 12, शुभमन गिल 21, चेतेश्वर पुजारा 1, रवींद्र जाडेजा 4, श्रेय़स अय्यर (0) आणि केएस भरत (17) धावांवर बाद झाला. त्यांच्यात पॅव्हेलियनमध्ये परतण्याची जणू स्पर्धाच सुरु होती.
- ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात चौथ्या ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर रविंद्र जाडेजाने खतरनाक ऑस्ट्रेलियन फलंदाज मार्नस लाबुशेनला शुन्यावर आऊट केलं होतं. पण तो अंपायरने नो-बॉल दिला. पहिल्याडावात तेव्हा ऑस्ट्रेलियाचा स्कोर 2 बाद 14 झाला असता. त्यानंतर लाबुशेनने उस्मान ख्वाजासोबत मिळून 96 धावांची भागीदारी केली. पहिल्याडावात लाबुशेनने 31 आणि उस्माम ख्वाजाने 60 धावा केल्या. या धावा महत्त्वपूर्ण ठरल्या.
- इंदोर कसोटीच्या दुसऱ्यादिवशी कॅप्टन रोहित शर्माने टीम इंडियाचा धोकादायक ऑफ स्पिनर रविचंद्रन अश्विनच्या हाती चेंडू सोपवायला उशिर केला. दुसऱ्यादिवशी पीटर हँडसकॉम्ब आणि कॅमरुन ग्रीन क्रीजवर असताना, अश्विन उशिराने गोलंदाजीसाठी आला. हँडसकॉम्ब आणि ग्रीनने मिळून 40 धावांची छोटी पण महत्त्वपूर्ण भागीदारी केली. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने पहिल्याडावात भारतावर 88 धावांची आघाडी घेतली. अश्विनने हँडसकॉम्बला आऊट करुन भारताला पाचवं यश मिळवून दिलं. पण, तो पर्यंत उशिर झाला होता.
- भारतीय टीमने या कसोटी सामन्यात DRS बद्दल योग्य निर्णय घेतले नाहीत. पहिल्या डावात टीम इंडियाने आपले तीन रिव्यु वाया घालवले. मार्नस लाबुशेन आऊट होता, तेव्हा भारताकडे एक रिव्यु शिल्लक होता. रोहित शर्माने सावध होत रिव्यु घेतला नाही. लाबुशेनने याचा फायदा उचलला व ख्वाजासोबत 96 धावांची भागीदारी केली.