पंतप्रधान मोदींच्या पत्राला जॉन्टी रोड्सने दिले खास उत्तर, प्रत्येक भारतीयाला अभिमान वाटेल…
असा कुठलाही क्रिकेटचा चाहता नसेल ज्याला जॉन्टी रोड्स हे नाव माहिती नसेल. दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू असलेला जॉन्टी रोड्स हा उत्तम क्षेत्ररक्षक होता. भारताविषयी आपल्या आसक्तीमुळे त्याने आपल्या मुलीचे नाव इंडिया ठेवले आहे.
दक्षिण आफ्रिकेचा माजी क्रिकेटपटू जॉन्टी रोड्सने (Jonty Rhodes) प्रजासत्ताक दिनानिमित्त (Republic day) पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याकडून मिळालेल्या पत्राला उत्तर दिले आहे. त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदींचे आभार मानले आहे. तसेच आपले कुटुंब संपूर्ण भारतासोबत प्रजासत्ताक दिन साजरा करत असल्याचेही त्याने आपल्या उत्तरात नमूद केले आहे. पंतप्रधान मोदींनी प्रजासत्ताक दिनी जॉन्टी रोड्सला पत्र (letter) पाठवले होते. यामध्ये त्यांनी रोड्सच्या भारताप्रती असलेल्या प्रेमाचा उल्लेख केला आहे. तसेच जॉन्टी रोड्सने आपल्या मुलीचे नावही इंडिया ठेवल्याचे नमूद केले. जॉन्टी रोड्सने पीएम मोदींच्या पत्राला उत्तर देताना लिहिले, ‘नरेंद्र मोदी जी तुमच्या प्रेमळ शब्दांबद्दल धन्यवाद. भारताच्या प्रत्येक भेटीत मी एक व्यक्ती म्हणून स्वत:ला अधिक समृद्ध झाल्यासारखे समजतो. माझे संपूर्ण कुटुंब संपूर्ण भारतासोबत प्रजासत्ताक दिन साजरा करते आणि भारतातील लोकांच्या हक्कांचे संरक्षण करणाऱ्या संविधानाचा आदर करते. जय हिंद’…
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाठवलेले पत्रही जॉन्टी रोड्सने आपल्या ट्विटमध्ये पोस्ट केले आहे. त्याचा मजकूर खालील प्रमाणे :
भारतातर्फे तुम्हाला नमस्कार, दरवर्षी २६ जानेवारीला आपण प्रजासत्ताक दिन साजरा करतो. हा तो दिवस आहे जेव्हा आपल्या संविधान सभेच्या प्रदीर्घ चर्चेनंतर भारतीय राज्यघटना लागू झाली. मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा देतो. भारताला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण होत असल्याने यंदाचे वर्ष खूप खास आहे. म्हणूनच मी भारतावरील तुमच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी तुम्हाला आणि भारतावर प्रेम करत असलेल्या इतर मित्रांना पत्र लिहायचे ठरवले आहे. मला आशा आहे की तुम्ही आमचा देश आणि आमच्या लोकांसोबत एकत्र काम करत राहाल.
गेल्या काही वर्षांत तुम्ही भारत आणि तिथल्या संस्कृतीशी एक विशेष बंध निर्माण केला आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या मुलीचे नाव या महान देशाच्या नावावर ठेवले तेव्हा हे विशेष कनेक्शन स्पष्टपणे दिसून आले. आमच्या देशाच्या मजबूत संबंधांचे तुम्ही विशेष दूत आहात. भारत सामाजिक- आर्थिक बदलांच्या ऐतिहासिक मालिकेचा साक्षीदार आहे. मला खात्री आहे की हे लोकांना सक्षम करेल आणि जागतिक स्तरावरही चांगले योगदान देईल. पुन्हा एकदा मी तुम्हाला प्रजासत्ताक दिनाच्या खूप खूप शुभेच्छा देतो आणि आगामी काळात तुमच्याशी बोलायला आवडेल.