मोठी बातमी! ऋषभ पंतवर परदेशात उपचार होणार?, आधी ‘या’ शहरात आणण्याच्या हालचाली, उपचार कोण करणार?; बीसीसीआयने काय म्हटलं?
त्याला कोणत्या पद्धतीचा मार लागला याची माहिती घेतील. त्यानंतरच पंतवर मुंबईतच उपचार करायचे की त्याला परदेशात पाठवायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे.
नवी दिल्ली: कार अपघातानंतर भारताचा स्टार खेळाडू ऋषभ पंत याची प्रकृती धोक्याबाहेर आहे. परंतु, पंतला ठणठणीत बरे करण्यासाठी बीसीसीआयने कंबर कसली आहे. ऋषभ सध्या डेहराडूनमधील मॅक्स रुग्णालयात उपचार घेत आहे. मात्र, तरीही त्याला उपचारासाठी मुंबईला शिफ्ट करण्याच्या बीसीसीआयने हालचाली सुरू केल्या आहेत. तसेच वेळ पडल्यास पंतला उपचारासाठी परदेशात नेण्याचा निर्णयही घेतला जाऊ शकतो, असं सांगितलं जात आहे. त्यामुळे बीसीसीआय काय निर्णय घेते याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कार अपघातातून बचावलेल्या ऋषब पंतच्या शरीरावर जागोजागी जखमा झाल्या आहेत. त्याच्या डोक्याला, कपाळाला, चेहऱ्याला, हाताला, पायाला आणि पाठीला प्रचंड जखमा झाल्या आहेत. त्याच्या चेहरा आणि पाठीवर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली आहे. तसेच त्याचा एमआयआरही करण्यातक आला असून रिपोर्ट नॉर्मल आले आहेत.
सर्वात चिंतेची गोष्ट म्हणजे त्याच्या गुडघ्याच्या अस्थिबंधाला मोठा मार लागला आहे. त्याच्या गुडघ्याचे अस्थिबंध फुटले आहे. त्यामुळे त्याचं क्रिकेटच्या मैदानात उतरणं मुश्किल होण्याची शक्यता दिसत आहे. त्यामुळेच बीसीसीआयने आता सर्व सूत्रे हाती घेतली असून पंतवर परदेशात उपचार करण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत.
द टाइम्स ऑफ इंडियाच्या रिपोर्टनुसार, पंतच्या गुडघ्याच्या अस्थिबंधावर बीसीसीआयची मेडिकल टीम उपचार करणार आहे. पंतचा अपघात झाल्यानंतर बीसीसीआयचे डॉक्टर डेहराडूनमधील मॅक्स रुग्णालयातील डॉक्टरांशी संपर्क साधून आहेत.
पंतवर काय उपचार सुरू आहेत याची माहिती घेतली जात आहे. तसेच बीसीसीआयची टीमच पंतच्या गुडघ्याच्या अस्थिबंधावर इलाज करणार असल्याचं बीसीसीआयच्या डॉक्टरांनी डेहराडूनच्या डॉक्टरांना स्पष्टपणे सांगितलं आहे.
पंतला काही दिवसांसाठी डेहराडूनच्या या रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाणार आहे. त्यानंतर त्याला मुंबईला शिफ्ट केलं जाणार आहे. मुंबईत बीसीसीआयचे डॉक्टर त्याच्या गुडघ्याच्या अस्थिबंधाच्या तपासण्या करतील.
त्याला कोणत्या पद्धतीचा मार लागला याची माहिती घेतील. त्यानंतरच पंतवर मुंबईतच उपचार करायचे की त्याला परदेशात पाठवायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे.
पंतला अपघातामुळे प्रचंड जखमा झाल्या आहेत. त्याच्या गुडघ्याला मोठा मार लागला आहे. त्यामुळे तो संघात कधी पुनरागमन करणार याबाबत काहीच सांगता येत नाही.
त्याला मुंबईत आणल्यानंतरच याबाबतचं चित्रं स्पष्ट होणार आहे. 9 फेब्रुवारीपासून भारत-ऑस्ट्रेलिया दरम्यान कसोटी मालिका सुरू होणार आहे. या मालिकेत पंत खेळणार की नाही हे आताच सांगणं कठीण आहे.