मुंबई: विराट कोहलीच्या (Virat Kohli) कसोटी कर्णधारपदाच्या राजीनाम्यावर अत्यंत स्फोटक विधान करणारे भारताचे महान क्रिकेटपटू सुनील गावस्कर (Sunil gavaskar) यांनी पुढचा टेस्ट कॅप्टन कोण असावा? या बद्दल आपलं मत व्यक्त केलं आहे. विराटच्या जागी कसोटीमध्ये संघाचे नेतृत्व करण्यासाठी ऋषभ पंत (Rishabh Pant) योग्य उमेदवार आहे, असं गावस्कर यांनी म्हटलं आहे. विराटने काल अचानक कसोटी संघाच्या कॅप्टनशिपचा राजीनामा देऊन क्रिकेट जगताला धक्का दिला. विराटच्या जागी कसोटी संघाचे कर्णधारपद भूषवण्यासाठी ऋषभ पंत योग्य पर्याय आहे, असे गावस्कर यांनी म्हटले आहे.
24 वर्षांच्या ऋषभ पंतने मला प्रभावित केलं आहे. त्याच्यावर कसोटी संघाच्या कॅप्टनशिपची जबाबदारी सोपवली जाऊ शकते, असे गावस्कर म्हणाले. त्यांनी यासाठी मन्सूर अली खान पतौडी यांचं उदहारण दिलं. मन्सूर अली खान पतौडी खूप तरुणवयात कर्णधार झाले व अविश्वसनीय यश मिळवलं, असं त्यांनी सांगितलं.
मला आश्चर्य वाटलं नाही
“मला विराटच्या राजीनामा देण्याच्या निर्णयाचं अजिबात आश्चर्य वाटलं नाही. खरंतर सामना संपल्यानंतर प्रेझेंटेशन सेरेमनी होते, तेव्हा विराट राजीनामा देईल, असं मला वाटलं होतं. पण तेव्हा त्यांने हा निर्णय जाहीर केला असता, तर कुठल्यातरी रागातून हा निर्णय घेतलाय, असा संदेश गेला असता. त्यामुळे विराट 24 तास थांबला व त्यानंतर त्याने हा निर्णय जाहीर केला” असे गावस्कर म्हणाले
यशस्वी होता तरी राजीनामा का दिला?
विराट यशस्वी कर्णाधर होता, तरी त्याने राजीनामा का दिला? या प्रश्नावर गावस्कर म्हणाले की, “परदेशात मालिका हरणं बोर्ड आणि क्रिकेट चाहते दोघांकडूनही सहज स्वीकारलं जातं नाही.” “परदेशात मालिका गमावल्यानंतर कर्णधाराला पदावरुन हटवण्याचा धोका असतो. आधी सुद्धा हे घडलं आहे, आता सुद्धा असं घडू शकलं असतं. कर्णधारपदावरुन आपल्याला हटवलं जाईल, हा अंदाज विराटने बांधला असावा म्हणून त्याने कॅप्टनशिपचा स्वत:हून राजीनामा दिला” असं गावस्कर म्हणाले. कॅप्टनने व्यक्तीगत पातळीवर कितीही चांगली कामगिरी केली, तरी मालिकेच्या पराभवाचं सर्व खापर कर्णधारावरच फुटतं, असं गावस्कर म्हणाले.