Rishabh Pant खराब कॅप्टन, घमेंडीमुळे अनेकदा OUT झाला, ‘सीनियर’ खेळाडू खूप काही बोलून गेला
संघ जिंकतो, तेव्हा त्याचं श्रेय कॅप्टनला दिलं जातं, तसंच टीम हरते, तेव्हा कॅप्टनलाच जबाबदार धरल जातं. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) याला अपवाद नाहीय.
मुंबई: IPL 2022 मध्ये Delhi Capitals ला विशेष अशी चमकदार कामगिरी करता आली नाही. मुंबई इंडियन्स विरुद्ध पराभव झाल्यामुळे दिल्ली कॅपिटल्ससासाठी प्लेऑफचे दरवाजे बंद झाले. मुंबईच्या विजयामुळे रॉयल चॅलेंजर्स बँगलोर्सचा संघ प्लेऑफमध्ये दाखल झाला. संघ जिंकतो, तेव्हा त्याचं श्रेय कॅप्टनला दिलं जातं, तसंच टीम हरते, तेव्हा कॅप्टनलाच जबाबदार धरल जातं. दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार ऋषभ पंत (Rishabh Pant) याला अपवाद नाहीय. पराभवानंतर आता ऋषभ पंतच्या नेतृत्व क्षमतेबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण करण्यात येत आहे. ऋषभ पंत बद्दल माजी क्रिकेटपटू आकाश चोप्रा बरच काही बोलून गेला. आकाश चोप्राने ऋषभ पंतची कॅप्टनशिप आणि फलंदाजीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलय. आपल्या युट्यूब चॅनलवरुन आकाश चोप्राने ऋषभ पंतला बरच काही सुनावलं
कुलदीपला चौथी ओव्हर का नाही दिली?
“खेळाडू म्हणून ऋषभ पंत माझा फेव्हरेट आहे. तो मला भावतो. आम्ही एकाच क्लब कडून खेळलोय. पण त्याचं नेतृत्व चांगलं नाहीय. त्याच्या कॅप्टनशिपने मला अनेक सामन्यात विचार करायला भाग पाडलय. एका सामन्यात कुलदीप यादवने तीन ओव्हरमध्ये 4 विकेट घेतले होते. पण पंतने त्याला चौथी ओव्हर दिली नाही. अनेक सामन्यात दिल्ली कॅपिटल्सचे प्रमुख गोलंदाज चार षटक गोलंदाजी करु शकलेले नाहीत” असं आकाश चोप्रा म्हणाले.
ऋषभ पंतच्या फलंदाजीत सातत्य नव्हतं
ऋषभ पंतच्या फलंदाजीत सातत्य नव्हतं, त्याचा दिल्ली कॅपिटल्सला फटका बसला, असं आकाश चोप्रा म्हणाले. “ऋषभ पंतची न तळपलेली बॅट दिल्ली कॅपिटल्ससाठी महत्त्वाचा मुद्दा आहे. त्याने केलेल्या धावा विजयासाठी पुरेशा ठरल्या नाहीत. त्याने ज्या सामन्यात धावा केल्या, त्यातील बहुतांश सामन्यात पराभव झाला. तुम्हाला विजयात योगदान देणं आवश्यक आहे आणि पंत हे करु शकला नाही” असे आकाश चोप्रा म्हणाले.
विकेट बहाल केली
आकाश चोप्रा पुढे म्हणाला की, “ऋषभ पंतने अनेकदा विकेट फेकला. एका खराब फटक्यामुळे त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावं लागलं” “अनेकदा ऋषभ त्याच्या घमेंडीमुळे बाद झाला. मोठे फटके खेळण्याच्या नादात त्याने आपली विकेट बहाल केली” असं आकाश चोप्रा म्हणाले.