IND vs SA: दुसऱ्या पराभवानंतर Rishabh Pant चा दोन प्रमुख गोलंदाजांना स्पष्ट संदेश, पुढच्या सामन्यात प्रदर्शन सुधारा, अन्यथा….
ऋषभ पंत (Rishabh Pant) भलेही भारतीय क्रिकेट संघाचा तात्पुरता कर्णधार असेल, पण त्याला स्वत:कडून व संघाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. कॅप्टन म्हणून ऋषभ नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या पहिल्या दोन सामन्यात भारताचा पराभव झाला आहे.
मुंबई: ऋषभ पंत (Rishabh Pant) भलेही भारतीय क्रिकेट संघाचा तात्पुरता कर्णधार असेल, पण त्याला स्वत:कडून व संघाकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. कॅप्टन म्हणून ऋषभच्या नेतृत्वाखाली खेळल्या गेलेल्या पहिल्या दोन सामन्यात भारताचा पराभव झाला आहे. दिल्ली पाठोपाठ कटकमध्येही (Cuttack T 20) दुसऱ्या टी-20 सामन्यात भारताच्या पदरी निराशा आली. कटकमध्ये झालेल्या पराभवामागे फलंदाजांची सुमार कामगिरी हे एक कारण आहे. यावेळी फलंदाजांनी निराश केलं. पंत या सामन्यानंतर काही खेळाडूंना कामगिरी सुधारण्याचा सल्ला दिला. कटक येथे झालेल्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने (IND vs SA) भारताचा 4 विकेटने पराभव करत पाच सामन्यांच्या मालिकेत 2-0 अशी आघाडी घेतली. भारताने प्रथम फलंदाजी करताना 6 विकेट गमावून 148 धावा केल्या होत्या. धावा कमी होत्या, तरी फलंदाजांनी चांगली सुरुवात करुन दिली होती. पहिल्या 10 षटकात दक्षिण आफ्रिकेची धावसंख्या 3 बाद 57 होती. भुवनेश्वर कुमारने पावरप्लेमध्ये तीन विकेट काढून चांगली सुरुवात करुन दिली होती. मात्र तरीही टीम इंडियाचा पराभव झाला.
कधी खेळ पालटला?
“10 ते 15 धावा कमी पडल्या. गोलंदाजी करताना चांगल्या सुरुवातीनंतरही शेवटच्या 10 षटकात अनुकूल गोष्टी घडल्या नाहीत” असं ऋषभ पंत म्हणाला. “प्रथम फलंदाजी करताना 10-15 धावा कमी केल्या. भुवी आणि अन्य गोलंदाजांनी चांगली सुरुवात केली. पण दुसऱ्याहाफमध्ये अपेक्षित गोष्टी घडल्या नाहीत. 10-11 ओव्हर्सनंतर आम्ही चांगली गोलंदाजी केली नाही. तिथूनच मॅचची दिशा बदलली”, असं ऋषभ म्हणाला.
दोन गोलंदाजांना थेट इशारा
ऋषभ पंतने युजवेंद्र चहल आणि अक्षर पटेल या स्पिन जोडीला पुढच्या सामन्यांमध्ये प्रदर्शन सुधारण्याचा सल्ला दिला. फिरकी गोलंदाजांना चांगली कामगिरी करावी लागेल. अंतिम तीन सामने आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करु, असं तो म्हणाला. भारताचे प्रमुख तीन वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमार, हर्षल पटेल आणि आवेश खान यांनी 10 ओव्हर्समध्ये 47 धावा दिल्या व 5 विकेट काढले. तेच युजवेंद्र चहल-अक्षर पटेल जोडीने पाच ओव्हर्समध्ये 68 रन्स दिल्या व 1 विकेट काढला. दिल्लीमध्येही या दोघांची धुलाई झाली होती.