Rishabh Pant ने चाहत्यांना सेल्फीसाठी थांबवल, पण…तुम्ही सुद्धा ऋषभचं मनापासून कौतुक कराल
भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये (India England Tour) आहे. उद्यापासून कसोटी सामना सुरु होतोय. त्यानंतर वनडे आणि टेस्ट सीरीज खेळणार आहे.
मुंबई: भारतीय संघ सध्या इंग्लंडमध्ये (India England Tour) आहे. उद्यापासून कसोटी सामना सुरु होतोय. त्यानंतर वनडे आणि टेस्ट सीरीज खेळणार आहे. ऋषभ पंत (Rishabh Pant) कसोटी संघाचा भाग असल्याने तो सुद्धा इंग्लंड मध्ये आहे. 1 जुलै पासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेत ऋषभकडून दमदार कामगिरीची अपेक्षा आहे. प्रॅक्टिस मॅचमध्ये (Practice Match) त्याने तसा खेळही दाखवलाय. इंग्लंड दौऱ्यावर असलेल्या ऋषभ पंतच्या एका कृतीने सगळ्या नेटकऱ्यांच मन जिंकून घेतलय. निश्चित त्यासाठी त्याचं कौतुक केलं पाहिजे. भारतीयांमध्ये क्रिकेटपटूंबद्दल एक क्रेझ पहायला मिळते. क्रिकेटपटू एखाद्या ठिकाणी गेले की, त्यांच्याभोवती चाहत्यांचा गराडा पडतो. इंग्लंडमध्ये भारतीय मोठ्या संख्येने स्थायिक आहेत. त्यामुळे तिथे वेगळं चित्र नसतं. रोहित-विराट इंग्लंडमध्ये दाखल झाल्यानंतर शॉपिंगसाठी बाहेर पडले होते. त्यावेळी चाहत्यांनी त्यांच्यासोबत भरपूर फोटो काढून घेतले.
ऋषभ पंतलाही तोच अनुभव आला
इंग्लंडमध्ये ऋषभ पंतलाही तोच अनुभव आला. ऋषभ इंग्लंडच्या रस्त्यावर फिरत असताना, चाहत्यांच्या त्याच्यासोबत सेल्फी काढायचा होता. ऋषभने सेल्फीची इच्छा असणाऱ्या चाहत्यांना निराश केलं नाही. पण त्याआधी त्याने जी कृती केली, त्याने नेटकऱ्यांना जिंकून घेतलं आहे. सेल्फी काढण्याआधी ऋषभने आधी रस्त्यावरच्या एका बेघर माणसाला मदत केली.
टि्वटर युजरने शेअर केला अनुभव
एका टि्वटर युजरने ऋषभ सोबतचा हा अनुभव शेअर केलाय. ऋषभने या कृतीने फोटो काढायला आलेल्या चाहत्यांच मन सुद्धा जिंकून घेतलं. “आम्ही जेव्हा ऋषभकडे फोटो काढण्यासाठी विचारणा केली, तेव्हा त्याने लगेच येतो, असं सांगितलं. त्यानंतर तो ब्रिज खाली बसलेल्या बेघर माणसाजवळ गेला व त्याला अन्न दिलं. अजून, काही हवं का? अशी सुद्धा ऋषभने त्या माणसाकडे विचारणा केली” ध्रुव माताडी नावाच्या युजरने टि्वट करुन या घटनेबद्दल सांगितलं.
Just wanted to highlight the warm gesture by @RishabhPant17 . When we asked him for a picture he told us that he’ll be back in a moment. Then he went towards a homeless man sitting under the bridge and gave him food and also asked him if he wanted anything else! What a man! pic.twitter.com/kWCrl1znzu
— Dhruv Matade (@_thepolestar) June 29, 2022
सराव सामन्यात उत्साहवर्धक कामगिरी
ऋषभ पंत नुकत्याच संपलेल्या दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या सीरीजमध्ये त्याआधी आयपीएल 2022 मध्ये विशेष चमक दाखवू शकलेला नाही. त्याचा फॉर्मसाठी संघर्ष सुरु आहे. सराव सामन्यातील त्याची कामगिरी निश्चित उत्साहवर्धक आहे. आता कसोटीतही त्याने तशाच पद्धतीच खेळ दाखवावा अशी तमाम क्रिकेट रसिकांची इच्छा आहे.