Ind vs Eng : रोहित शर्माची तुफानी खेळी, विदेशी भूमीवर ठोकलं पहिलं शतक, षटकाराची परंपरा कायम
ओव्हल कसोटी सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक झळकावले. परदेशी भूमीवरचे रोहितचे हे पहिले कसोटी शतक आहे.
लंडन : इंग्लंड दौऱ्यावर भारताचे इतर फलंदाज संघर्ष करताना दिसले आहेत, तर रोहित शर्मा वेगळ्याच फॉर्ममध्ये दिसत आहे. रोहितने लॉर्ड्स आणि हेडिंग्ले येथे खेळवण्यात आलेल्या कसोटी सामन्यांमध्ये शानदार खेळी साकारल्या आणि अर्धशतके केली होती, पण तो त्या अर्धशतकांचे शतकांत रूपांतर करू शकला नाही. रोहितने ओव्हल मैदानावर खेळवल्या जाणाऱ्या चौथ्या कसोटी सामन्यात ही कामगिरी पूर्ण केली. (Rohit sharma hits first test century away from home at the oval against england)
सामन्याच्या तिसऱ्या दिवशी रोहितने आपल्या कसोटी कारकिर्दीतील आठवे शतक झळकावले. परदेशी भूमीवरचे रोहितचे हे पहिले कसोटी शतक आहे. यापूर्वी त्याने परदेशात कसोटीत शतक झळकावले नव्हते. रोहितची शतक पूर्ण करण्याची शैलीही वेगळी होती. 64 व्या षटकात गोलंदाजी करणाऱ्या मोईन अलीच्या चेंडूवर त्याने शानदार षटकार मारून शतक पूर्ण केले.
रोहित नोव्हेंबर 2013 मध्ये कोलकाता येथे पहिला कसोटी सामना खेळला होता, पण त्यानंतर तो कसोटीत परदेशी भूमीवर शतक झळकावू शकला नाही. ही कमतरता रोहितने यावेळी इंग्लंडमध्ये सात वर्षानंतर (2021) मध्ये पूर्ण केली. रोहितने षटकार मारून कसोटीत शतक पूर्ण करण्याची ही तिसरी वेळ आहे.
राहुल द्रविडला टाकले मागे
रोहितचे परदेशी भूमीवरील आणि इंग्लंडमधील कसोटीतील हे पहिले कसोटी शतक असले तरी त्याने याआधी मर्यादित षटकांत इंग्लंडच्या भूमीवर शतक झळकावले आहे. तीनही फॉरमॅटबद्दल बोलायचे झाले तर इंग्लंडमधील त्याचे हे एकूण नववे शतक आहे आणि या बाबतीत त्याने राहुल द्रविडला मागे टाकले आहे. राहुलने इंग्लंडमध्ये तीनही फॉरमॅटमध्ये एकूण आठ शतकं ठोकली आहेत. यासह, इंग्लंडमध्ये शतक झळकावणाऱ्या परदेशी फलंदाजांच्या यादीत तो व्हिव रिचर्ड्सच्या बरोबरीत उभा आहे.
रिचर्ड्सने इंग्लंडमध्ये एकूण नऊ शतके केली आहेत आणि रोहितने आज त्या विक्रमाची बरोबरी केली आहे. ऑस्ट्रेलियाचे महान फलंदाज सर डॉन ब्रॅडमन या दोघांच्या पुढे आहेत. खेळाच्या तीनही फॉरमॅटमध्ये शतक झळकावणारा रोहित भारताचा दुसरा फलंदाज आहे. त्याच्या आधी केएल राहुलने ही कामगिरी केली आहे. या दोन्ही फलंदाजांनी इंग्लंडच्या भूमीवर कसोटी, टी -20 आणि एकदिवसीय या तीनही फॉरमॅटमध्ये शतके केली आहेत.
भारताची चांगली सुरुवात
रोहितने या सामन्याच्या दुसऱ्या डावात सुरुवातीपासून शानदार फलंदाजी केली, सुरुवातीला त्याने त्याचा सलामीचा साथीदार केएल राहुलसह संघाला चांगली सुरुवात करुन दिली. त्याने राहुलसोबत पहिल्या विकेटसाठी 83 धावांची भागीदारी केली. मात्र, राहुल अर्धशतक पूर्ण करू शकला नाही, 46 या वैयक्तिक धावसंख्येवर जेम्स अँडरसनचा बळी ठरला. यानंतर रोहितने चेतेश्वर पुजारासह भारतीय डाव सांभाळला. दोघांमध्ये आतापर्यंत नाबाद शतकी भागीदारी झाली आहे.
इतर बातम्या
तो परत आला… भारताच्या गोलंदाजीवेळी Jarvo 69 मैदानात, इंग्लंडच्या फलंदाजाला दिला धक्का!
IND vs ENG : ‘हिटमॅन’चा आणखी एक ‘हिट’ रेकॉर्ड, सलामी फलंदाज म्हणून गाठलं नव शिखर
(Rohit sharma hits first test century away from home at the oval against england)