रोहित शर्मा श्रीलंकेविरुद्ध वनडे मालिका खेळणार का? विराट, बुमराहबाबत काय आहे अपडेट
रोहित शर्मा, विराट कोहली यांनी टी२० मधून निवृत्ती जाहीर केल्यानंतर आता त्यांना वनडे सामन्यांमध्ये पाहण्यासाठी चाहते उत्सूक आहेत. आगामी श्रीलंका दौऱ्यात हे दोघे खेळाडू खेळणार की नाहीत याबाबत आज संघ जाहीर झाल्यानंतर कळू शकते.
टीम इंडिया श्रीलंका दौऱ्यावर जाणार आहे. त्यासाठी लवकरच भारतीय संघाची घोषणा होणार आहे. भारतीय क्रिकेट संघ तीन टी-२० आणि तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका खेळणार आहे. जी २७ जुलैपासून सुरू होणार आहे. तर वनडे मालिका ऑगस्टमध्ये होणार आहे. रोहित शर्मा, विराट कोहली आणि रवींद्र जडेजा यांनी T20 वर्ल्डकप जिंकल्यानंतर टी२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केलीये. पण ते कसोटी आणि एकदिवसीय सामने खेळणार आहेत. याआधी रोहित शर्मा हा या सीरीजमध्ये खेळणार नसल्याचं बोललं जात होतं. पण आता तो खेळणार असल्याची माहिती समोर आली आहे.
रोहित शर्मा कर्णधार असणार
भारत विरुद्ध श्रीलंका वनडे मालिकेसाठी भारतीय संघाची लवकरच घोषणा होणार आहे. रोहित शर्मा या वनडे सीरीजतमध्ये खेळणार असल्याने तोच संघाचा कर्णधार असणार आहे. T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद जिंकून भारतात आल्यानंतर त्यांचं भव्य स्वागत करण्यात आले होते. क्रिकबझच्या वृत्तानुसार, बुधवारी अजित आगरकर यांच्या नेतृत्वाखाली निवड समितीची बैठक होणार आहे. रोहित शर्मा परदेशात असल्याने तो व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी होऊ शकतो. रोहित शर्मा जर खेळला नाही तर त्याच्या जागी केएल राहुल आणि श्रेयस अय्यर यांना कर्णधार केलं जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पण आता रोहित शर्मा खेळणार असल्याने त्याची गरज भासणार नाही
पुढच्या वर्षी आयसीसीचा आणखी एक मोठी स्पर्धा चॅम्पियन्स ट्रॉफी होणार आहे. यासाठी टीम इंडियाला आतापासून तयारी सुरु करावी लागणार आहे. त्याआधी श्रीलंकेत सीरीज खेळवली जात आहे. रोहित शर्मा सोबत विराट कोहली आणि जसप्रीत बुमराह खेळणार की नाही याबाबत अजून कुठलीही अपडेट समोर आलेली नाही. बुधवारी संध्याकाळपर्यंत बीसीसीआयकडून संघाची घोषणा केली जाऊ शकते.
टी20 चा कर्णधार कोण?
दुसरीकडे रोहित शर्माच्या टी-20मधून निवृत्तीनंतर कर्णधार कोण असणार याबाबत ही चर्चा सुरु आहेत. हार्दिक पांड्याचे नाव चर्चेत होते, पण त्याच्या नावावर सहमती होत नसल्याचं कळत आहे. त्याच्या फिटनेसमुळे हा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे सूर्यकुमार यादवच्या नावाची देखील चर्चा आहे. 2026 मध्ये होणाऱ्या टी-20 विश्वचषकासाठी निवड समिती आतापासून संघाला तयार करण्याच्या प्रयत्नात आहे.