‘Rohit sharma, राहुल द्रविड यांना भारतीय क्रिकेट बदलायचय, पण…’ नासिर हुसैन यांच्याकडून परखड विश्लेषण
नासिर हुसैन टीम इंडियाचे कडवे टीकाकार म्हणून ओळखले जातात, त्यांनी जे म्हटलय, ते निश्चित विचार करायला भाग पाडतं
लंडन: इंग्लंडचे माजी कर्णधार नासिर हुसैन टीम इंडियाचे कडवे टीकाकार म्हणून ओळखले जातात. त्यांनी वेळोवेळी भारतीय संघाच्या कामगिरीवर भाष्य केलं आहे. मागच्या आठवड्यात टी 20 वर्ल्ड कपच्या सेमीफायनलमध्ये टीम इंडियाचा इंग्लंडकडून पराभव झाला. इंग्लंडने भारतावर तब्बल 10 विकेट राखून दणदणीत विजय मिळवला. नासिर हुसैन यांनी टीम इंडियाच्या या कामगिरीच आपल्या नजरेतून विश्लेषण केलं आहे. सेमीफायनलमध्ये टीम इंडियाच नेमकं काय चुकलं? त्यावर त्यांनी भाष्य केलय.
द्रविड-रोहित जोडीने बदलून दाखवलं, पण….
“कॅप्टन रोहित शर्मा आणि हेड कोच राहुल द्रविड यांनी द्विपक्षीय सीरीजमध्ये विचारसरणी बदलली. पण आयसीसी नॉकआऊट्समध्ये ते जुन्या पद्धतीच क्रिकेट खेळले. मी रवी शास्त्रींना सुद्धा विचारलं, फलंदाजीमध्ये आम्ही भित्रेपणा दाखवला, ते बदलण्याची गरज आहे, असं त्यांनी सांगितलं.
रोहित शर्मा आणि राहुल द्रविड यांना तेच बदलायच आहे. द्विपक्षीय सीरीजमध्ये त्यांनी ते बदललं. इंग्लंड विरुद्ध सुद्धा ते तसच खेळले. ट्रेंट ब्रिजवर सूर्यकुमार यादवने 55 चेंडूत 117 धावा फटकावल्या. पण वर्ल्ड कप सेमीफायनलमध्ये ते जुन्या पद्धतीच क्रिकेट खेळले. 10 ओव्हर्स 66 रन्स 2 विकेट” असं हुसैन स्काय स्पोर्ट्सवर म्हणाले.
खेळाडू नाही, विचारसरणी महत्त्वाची
टीम इंडियाला इऑन मॉर्गनसारखा कॅप्टन हवा, जो तुम्हाला मुक्तपणे खेळण्याच स्वातंत्र्य देईल. “टीम इंडिया अजूनही मजबूत संघ आहे. तुम्ही कागदावर ही टीम बघा. दुसऱ्या टीम्सप्रमाणे टीम इंडियालाही जसप्रीत बुमराह, रवींद्र जाडेजाच्या दुखापतीचा फटका बसला. पण नॉकआऊट्समध्ये तुमचा बदललेला दृष्टीकोन आवश्य आहे. युवा खेळाडू येणार असं म्हटलं जातय. पण खेळाडू नाही, विचारसरणी महत्त्वाची आहे” असं हुसैन यांनी म्हटलं आहे.
….तरी आम्ही तुमच्या पाठिशी राहू
“टीम इंडियाकडे इऑन मॉर्गनसारखा खेळाडू हवा. जो टीमला सांगेल, जाऊन बिनधास्त क्रिकेट खेळा. जा आणि 20 ओव्हर्समध्ये शक्यत असेल तितकी फटकेबाजी करा. आयपीएलमध्ये खेळता तसं खेळा. भारतासाठी हे करा. बाकीचा विचार करु नका. 120 धावात ऑलआऊट झालात, तरी आम्ही तुमच्या पाठिशी राहू असां मेसेज द्या” असं नासिर हुसैन यांनी म्हटलं आहे.