T20 World Cup मधील लज्जास्पद पराभवामधून घेतला धडा, रोहित-राहुलने खोलीत बसून केली नव्या टीमची प्लानिंग
मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कप (T 20 World cup) मध्ये साखळी फेरीतच टीम इंडियाचं (Team India) आव्हान संपुष्टात आलं होतं. स्पर्धा सुरु होण्याआधी विराट कोहलीने कॅप्टनशिप सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता.
मुंबई: मागच्यावर्षी टी 20 वर्ल्ड कप (T 20 World cup) मध्ये साखळी फेरीतच टीम इंडियाचं (Team India) आव्हान संपुष्टात आलं होतं. स्पर्धा सुरु होण्याआधी विराट कोहलीने कॅप्टनशिप सोडण्याचा निर्णय जाहीर केला होता. टी 20 वर्ल्ड कप नंतर टीम इंडियात दोन महत्त्वाचे बदल झाले. रोहित शर्माला (Rohit Sharma) संघाचं कॅप्टन बनवण्यात आलं, तर रवी शास्त्रींच्या जागी राहुल द्रविड यांची हेड कोच म्हणून नियुक्ती करण्यात आली.
खेळण्याची स्टाइल बदलण्याची गरज
“दुबई मध्ये झालेल्या वर्ल्ड कप नंतर आम्हाला जाणवलं की, आम्हाला आमच्या विचारांमध्ये बदल करण्याची आवश्यकता आहे” असं भारतीय कर्णधार रोहित शर्माने म्हटलं होतं. स्टार स्पोर्ट्सवरील एका शो मध्ये भारतीय कर्णधाराने म्हटलं की, “टीमला एक स्पष्ट संदेश देण्यात आला. ते आव्हान स्वीकारण्यासाठी तयार होते. कॅप्टन आणि कोच कडून स्पष्ट संदेश असेल, तर टीम सुद्धा पुढे जाण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी खेळाडूंना स्वातंत्र्य हवं असतं” “आम्ही जास्त बदल केलेले नाहीत. आम्ही संतुलन साधण्यावर काम करतोय. आम्ही जास्त क्रिकेट खेळतोय. अशा स्थितीत दुखापती आणि वर्कलोडवर लक्ष देण्याची आवश्यकता आहे. आम्ही आमची बेंच स्ट्रेंथ अजून मजबूत करण्यावर लक्ष देतोय. पुढच्या 20 ते 30 वर्षांचा विचार करुन आम्ही संघाची बांधणी करतोय” असं रोहित म्हणाला.
आम्हाला तिन्ही फॉर्मेट मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने खेळायचय
“राहुल द्रविड कोच बनल्यानंतर मी त्यांना भेटलो. संघाला पुढे घेऊन जाण्याबद्दल आम्ही चर्चा केली. बऱ्याच प्रमाणात आम्ही दोघे एकसारखाच विचार करत होतो. त्यामुळे संघाला स्पष्ट संदेश देणं, माझ्यासाठी थोडं सोप गेलं” असं रोहित म्हणाला. “आम्हाला ग्रुप मध्ये कुठला गोंधळ निर्माण करायचा नव्हता. आम्हाला आमची क्रिकेटची स्टाइल बदलायची होती. आम्हाला तिन्ही फॉर्मेट मध्ये वेगवेगळ्या पद्धतीने खेळायचय” असं रोहित म्हणाला.