‘सचिनला सगळं काही माहित आहे, पण मला त्याच्याकडून….’, Vinod Kambli नोकरीच्या शोधात
भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सध्या क्रिकेटशी संबंधित काम शोधतोय. सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून मिळणारी पेन्शन एवढच एकमेव उत्त्पनाच साधन आहे.
मुंबई: भारताचा माजी क्रिकेटपटू विनोद कांबळी सध्या क्रिकेटशी संबंधित काम शोधतोय. सध्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाकडून मिळणारी पेन्शन एवढच एकमेव उत्त्पनाच साधन आहे. त्याची आर्थिक स्थिती फारशी चांगली नाहीय. विनोद कांबळी आता 50 वर्षांचा झाला आहे. 2019 मध्ये त्याने टी 20 मुंबई लीग स्पर्धेत शेवटचा कोचिंगचा जॉब केला होता. त्यानंतर कोरोनामुळे सगळच कोलमडलं. सध्या विनोद कांबळीला फक्त BCCI कडून मिळणाऱ्या 30,000 रुपयाच्या पेन्शनचा आधार आहे. कांबळी नेरुळ येथील तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादामी मध्ये युवा क्रिकेटपटुंना मार्गदर्शन करायचा. पण नेरुळ पर्यंतचा प्रवास खूप लांब पडायचा म्हणून त्याने ते बंद केलं.
सकाळी 5 वाजता उठावं लागायच
“मी सकाळी 5 वाजता उठायचो. टॅक्सी पकडून डी.वाय.पाटील स्टेडियम मध्ये जायचो. खूप दगदग व्हायची. त्यानंतर मी संध्याकाळी बीकेसी ग्राऊंड मध्ये कोचिंग सुरु केली” असं कांबळीने मिड डे ला सांगितलं. “मी निवृत्त क्रिकेटपटू आहे. पूर्णपणे बीसीसीआयकडून मिळणाऱ्या पेन्शनवर अवलंबून आहे. बोर्डाक़डून मिळणारे पैसे हेच एकमेव माझ्या उत्त्पन्नाच साधन आहे. त्यासाठी मी खरोखर त्यांचा आभारी आहे. त्यामुळे मला कुटुंब चालवता येतय” असं कांबळी म्हणाला.
मुंबई क्रिकेट असोशिएशनकडे मदत मागितली
“मी मुंबई क्रिकेट असोशिएशनकडे मदत मागितली आहे. मला कुटुंबही चालवायच आहे. मी MCA ला अनेकदा सांगितलं, तुम्हाला गरज लागली, तर मी आहे. वानखेडे स्टेडियम असो किंवा बीकेसी मी उपलब्ध आहे. मुंबई क्रिकेटने मला बरच काही दिलय. मी माझं आयुष्य या खेळाला दिलय. निवृत्तीनंतर तुमच्यासाठी क्रिकेट नसतं. पण आयुष्यात तुम्हाला स्थिर रहायचं असेल, तर काम मिळणं आवश्यक आहे” असं कांबळी म्हणाला.
माझ्या पाठिशी तो नेहमीच उभा आहे
बालपणीचा मित्र आणि महान क्रिकेटपटू सचिन तेंडुलकरला तुझी आर्थिक स्थिती माहित आहे का? या प्रश्नावर कांबळी म्हणाला की, “सचिनला सगळं काही माहित आहे. पण मला त्याच्याकडून कुठलीही अपेक्षा नाही. त्याने मला तेंडुलकर मिडलसेक्स ग्लोबल अकादामी काम दिलं होतं. त्याचा मला आनंद आहे. तो चांगला मित्र आहे. माझ्या पाठिशी तो नेहमीच उभा आहे”