सरफराज खानने ऋषभ पंतला वेगळ्याच पद्धतीने रनआऊट होता होता वाचवलं, पाहा कसं ते
न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात मानहानीकारक पराभवाच्या सावलीतून टीम इंडिया बाहेर पडली आहे. न्यूझीलंडने घेतलेली 356 धावांची आघाडी टीम इंडियाने मोडून काढली आहे. मात्र न्यूझीलंडला विजयासाठी किती धावांचं आव्हान देणार याबाबत क्रीडाप्रेमींमध्ये चर्चा आहे. 150 धावा खूप होतील असं क्रीडातज्ज्ञांचं म्हणणं आहे.
बंगळुरु कसोटीतील पहिला दिवस पावसामुळे वाया गेला. दुसऱ्या दिवशी नाणेफेकीचा कौल झाला आणि भारताने फलंदाजीचा निर्णय घेतला. पण भारताचा संपूर्ण संघ अवघ्या 46 धावांवर बाद झाला. प्रत्युत्तरात न्यूझीलंडने 402 धावांची खेळी करत 356 धावांची आघाडी घेतली. ही आघाडी मोडून काढतानाच टीम इंडिया सामना गमावेल अशी स्थिती होती. पण आघाडीच्या फलंदाजांनी सामना हातून सोडला नाही. दुसऱ्या डावात कमबॅक करत पहिल्यांदा 356 धावांची आघाडी मोडून काढली. सामन्याच्या चौथ्या दिवशी सरफराज खान आणि ऋषभ पंत जोडीने कमाल केली. चौथ्या गड्यासाठी दोघांनी मिळून 177 धावांची भागीदारी केली. पण एक क्षण असा आला होता की ऋषभ पंतची विकेट पडते की काय असं वाटत होतं. दुसरी धाव घेताना ऋषभ पंतचं लक्ष बॉलकडे होतं. पण सरफराज खानची डोक्यालिटी आणि ऋषभ पंतचं नशीब यामुळे त्याची विकेट वाचली.
बंगळुरू कसोटीत भारताच्या डावाचं 65 षटक सुरु होतं. तेव्हा भारताची धावसंख्या 3 बाद 270 इतकी होती. न्यूझीलंडची आघाडी मोडण्यासाठी 86 धावांची आवश्यकता होता. ही आघाडी मोडून काढण्यासाठी सरफराज खानने आक्रमक खेळी केली. त्याने मॅट हेनरीच्या गोलंदाजीवर डीप बॅकवर्ड पॉइंटला कट केला आणि एक धाव घेतली. पण पंतने दुसऱ्या धावेसाठी पिक घेतला पण रनआऊट होण्याची शक्यता सरफराज खानला होती. सरफराज खानने यावेळी खेळपट्टीवर उड्या मारून बॅटचे हातवारे करून पंतला थांबवण्याचा प्रयन्त केला. त्यात त्याला यश आलं खरं पण विकेट नशिबाने वाचली.
Rishabh bhai, Run out is the last thing we need brother.
Sarfaraz jumping helped distract the wicket keeper.#INDvNZ pic.twitter.com/J2BaKWyVwr
— Ankit (@2dPointtt) October 19, 2024
सरफराजच्या ओरडण्याच्या आवाजातही न्यूझीलंडचा विकेटकीपर टॉम ब्लंडेल सावध झाला. रनआऊटची संधी असल्याचं पाहून चेंडू लवकर पिक करण्यासाठी पुढे सरसावला. पण त्याचा अंदाज चुकला आणि लडखडला. त्यामुळे पंतला रनआऊट करण्याची आलेली संधी हुकली. दरम्यान, सरफराज खानने 195 चेंडूत 18 चौकार आणि 3 षटकारांच्या मदतीने 150 धावा केल्या. तर ऋषभ पंतने 105 चेंडूत 9 चौकार आणि 5 षटकाराच्या मदतीने 99 धावा केल्या. त्याचं शतक अवघ्या एका धावेने हुकलं.