VIDEO: 7 SIX, 75 चेंडूत प्रतिस्पर्धी संघाचा खेळ संपवला, न्यूझीलंडच्या ‘गांगुली’चा कहर
न्यूझीलंडचा गांगुली. हे ऐकून, वाचून तुम्ही थोडे चक्रावून जालं. भारतात सौरव गांगुलीला बघितलय, आता न्यूझीलंड मध्ये कुठला गांगुली? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल.
मुंबई: न्यूझीलंडचा गांगुली. हे ऐकून, वाचून तुम्ही थोडे चक्रावून जालं. भारतात सौरव गांगुलीला बघितलय, आता न्यूझीलंड मध्ये कुठला गांगुली? हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर, न्यूझीलंड मधल्या या गांगुलीचा नावाशी नाही, कामाशी संबंध आहे. तुम्ही त्याची फलंदाजी पाहिल्यानंतर सौरव गांगुलीचीच आठवण येईल. लेफ्टी बॅटिंग करताना प्रतिस्पर्धी संघाच्या गोलंदाजांवर तुटून पडणं, पुढे येऊन षटकार खेचणं, मार्क चॅपमॅनची बॅटिंग पाहिल्यानंतर गांगुलीची आठवण येते. स्कॉटलंड विरुद्ध सामन्यात त्याने शानदार शतकी खेळी केली. स्कॉटलंडने मोठी धावसंख्या उभारुनही चॅपमॅनने आपल्या फलंदाजीच्या बळावर न्यूझीलंडला विजय मिळवून दिला.
मार्क चॅपमॅनचा कहर
स्कॉटलंड विरुद्धच्या एकमेव वनडे सामन्यात मार्क चॅपमॅनने शतक ठोकलं. या डावखुऱ्या फलंदाजाने 75 चेंडूत नाबाद 101 धावा फटकावल्या. चॅपमॅनने आपल्या इनिंग मध्ये 7 षटकार आणि 6 चौकार लगावले. त्याचा स्ट्राइक रेट 134 पेक्षा जास्त होता. आकड्यांवरुनच चॅपमॅनने स्कॉटलंडच्या गोलंदाजांची कशी धुलाई केली असेल, त्याची कल्पना येते. त्याच्याशिवाय डॅरेल मिचेलने नाबाद 74 धावा फटकावल्या. चॅपमॅन आणि मिचेलच्या शतकी भागीदारीच्या बळावर न्यूझीलंडने 307 धावांचे विशाल लक्ष्य 45.5 षटकात पूर्ण केलं.
View this post on Instagram
चॅपमॅनचा गांगुलीसारखा अंदाज
मार्क चॅपमॅनचा बॅटिंगचा अंदाज सौरव गांगुलीसारखा आहे. स्पिनर्स विरुद्ध तो कमलीची फलंदाजी करतो. गांगुली ज्या प्रमाणे पुढे येऊन स्पिनर्सची लाइन आणि लेंग्थ बिघडवून टाकायचे. चॅपमॅन सुद्धा तेच करतो. चॅपमॅनने स्कॉटलंड विरुद्ध अशीच फलंदाजी केली. त्याने आतापर्यंत आपल्या छोट्याशा करीयर मध्ये प्रभावित केलं आहे. चॅपमॅनने 7 वनडे सामन्यात 2 शतकं झळकावली आहेत. त्याची सरासरी 50 च्या पुढे आहे. स्कॉटलंड विरुद्ध टी 20 सीरीज मध्ये त्याने जबरदस्त फलंदाजी केली होती. दुसऱ्या टी 20 सामन्यात चॅपमॅनने 44 चेंडूत 83 धावांची इनिंग खेळून न्यूझीलंडला 102 धावांनी विजय मिळवून दिला. न्यूझीलंडने टी 20 सीरीज 2-0 अशी जिंकली होती. आता एकमेव वनडे सामनाही जिंकला आहे.