T20 World Cup स्पर्धेच्या पहिल्याच दिवशी थरारक सामना, स्कॉटलंडचा बांगलादेशवर निसटता विजय
ख्रिस ग्रीव्ह्सच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर स्कॉटलंडने टी -20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी बांगलादेशचा 6 धावांनी पराभव केला.
दुबई : ख्रिस ग्रीव्ह्सच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर स्कॉटलंडने टी -20 विश्वचषक स्पर्धेच्या पहिल्या दिवशी बांगलादेशचा 6 धावांनी पराभव केला. गट ब मधील सामन्यात नाणेफेक गमावल्यानंतर स्कॉटलंडने प्रथम फलंदाजी करताना 9 गड्यांच्या बदल्यात 140 धावांचे माफक आव्हान उभे केले. मात्र बांगलादेशचे दिग्गज हे लक्ष्य गाठण्यात अपयशी ठरले. (Scotland defeated Bangladesh by 6 runs in T20 World Cup first match)
सलामीवीर जॉर्ज मंझीच्या 29 धावांच्या योगदानानंतरही स्कॉटलंड एका टप्प्यावर 6 बाद 53 धावांवर संघर्ष करत होता. त्यानंतर ग्रीव्ह्सने (28 चेंडूत 45 धावा, 4 चौकार, 2 षटकार) मार्क वॅट (17 चेंडूत 22) सोबत 51 धावांची भागीदारी केली, ज्यामुळे स्कॉटलंडच्या संघाला 140 धावांपर्यंत मजल मारता आली.
आपला दुसरा सामना खेळणाऱ्या ग्रीव्ह्सने गोलंदाजीतही उत्कृष्ट कामगिरी करत स्कॉटलंडला सामन्यात जिवंत ठेवले. बांगलादेश सुरुवातीच्या धक्क्यातून सावरत असताना मुशफिकुर रहीम (36 चेंडूत 38) आणि शाकिब अल हसन (28 चेंडूत 20) सलग षटकांत बाद झाले. अखेर बांगलादेशचा संघ 7 विकेट्सच्या बदल्यात 134 धावाच करू शकला. अशा प्रकारे स्कॉटलंडने दोन महत्त्वाचे गुण मिळवले.
ग्रीव्ह्सने तीन षटकांत 19 धावा देऊन दोन बळी घेतले. ब्रॅड व्हीलने 24 धावांत 3, तर जॉन डेव्ही आणि मार्क वॅट यांनी प्रत्येकी एक विकेट घेतली. स्कॉटलंडच्या वेगवान गोलंदाजांनी शानदार गोलंदाजी केली आणि बांगलादेशचे सलामीवीर सौम्य सरकार (5) आणि लिटन दास (5) या दोघांना बराच वेळ दबावाखाली ठेवले, ज्यातून ते शेवटपर्यंत सावरू शकले नाहीत.
स्कॉटलंडच्या गोलंदाजांची कमाल
बांगलादेश पॉवरप्लेमध्ये दोन विकेट्सच्या बदल्यात फक्त 25 धावांपर्यंत पोहोचू शकला होता. बांगलादेशचे दोन सर्वात अनुभवी खेळाडू रहीम आणि शाकिब यांनी डाव सावरण्याचा प्रयत्न केला. दोघांनीही 47 धावांची भागीदारी केली, पण त्यासाठी 46 चेंडू खर्च झाले, ज्यामुळे संघावर दबाव वाढला. रहिमने मायकल लीस्कला सलग दोन षटकार मारून 9 व्या षटकात स्कोअर 50 धावांवर नेला, पण ग्रीव्ह्सने चेंडू हाती घेताच रहीम त्याच्यासमोर फेल झाला. ग्रीव्ह्सने दोघांनाही पव्हेलियनचा रस्ता दाखवला आणि बांगलादेशला बॅकफूटवर ढकलले.
ग्रीव्ह्सच्या पहिल्या चेंडूवर, कॅलम मॅकलॉडने धावत जाऊन शाकिबचा सुंदर झेल घेतला. या लेगस्पिनरने पुढच्या षटकात रहिमला गुगलीवर बोल्ड केले. त्याला अफीफ हुसैनची (12 चेंडूत 18 धावा) विकेटही मिळाली असती, पण मायकेल क्रॉसने त्याचा झेल सोडला. डावखुरा फिरकीपटू वॅटने त्याला जास्त काळ मैदानावर टिकू दिले नाही. कर्णधार महमुदुल्लाह (23) आणि मेहदी हसन (नाबाद 13) केवळ पराभवाचे अंतर कमी करु शकले.
Scotland prevail ?
They register 6-run victory against Bangladesh to start their #T20WorldCup 2021 campaign with a bang!#BANvSCO | https://t.co/FVt5ei0KJq pic.twitter.com/wj69GOAB5n
— ICC (@ICC) October 17, 2021
इतर बातम्या
युवराज सिंगला हरियाणा पोलिसांकडून अटक अन् सुटका, चहलला अपमानास्पद शब्द वापरल्याबद्दल FIR
टी-ट्वेंटी वर्ल्डकपमध्ये भारत-पाकिस्तान सामना रद्द होणार? केंद्रीय मंत्र्यांचं मोठं विधान
T20 World Cup मध्ये 7 भारतीय क्रिकेटपटूंचं पदार्पण, पाकिस्तानला भिडून चौघे दाखवणार रुबाब
(Scotland defeated Bangladesh by 6 runs in T20 World Cup first match)