Mohammed shami गुरु बनल्यामुळे शाहीन आफ्रिदी अजून घातक बनला, भारताला ही उदारता महाग नाही ना पडणार?
T20 World Cup 2022: शाहीन शाह आफ्रिदीमुळे एका बॅट्समनला हॉस्पिटलमध्ये न्यावं लागलं आहे.
ब्रिस्बेन: टी 20 वर्ल्ड कप 2022 (T20 World Cup 2022) भारत-पाकिस्तान सामन्याचा (IND vs PAK) दिवस जवळ येत आहे. येत्या 23 ऑक्टोबरला मेलबर्नमध्ये ही मॅच होणार आहे. दोन्ही टीम्स या महामुकाबल्याची तयारी करत आहेत. या मॅचआधी टीम इंडियासाठी (Team India) थोडी चिंता वाढवणारी बातमी आहे. पाकिस्तानचा प्रमुख गोलंदाज शाहीन शाह आफ्रिदी फॉर्ममध्ये परतला आहे.
आफ्रिदीने विकेट घेतले आणि शमी ट्रेंडमध्ये
पाकिस्तान आणि अफगाणिस्तानमध्ये टी 20 वर्ल्ड कपची वॉर्मअप मॅच झाली. या सामन्यात शाहीन शाह आफ्रिदी किती घातक गोलंदाजी करतोय, ते पहायला मिळालं. आफ्रिदीने या मॅचमध्ये 2 विकेट काढले. त्याच्या या प्रदर्शनानंतर टि्वटरवर मोहम्मद शमीची चर्चा आहे. असं काय कारण आहे की, आफ्रिदीने विकेट घेतले आणि शमी ट्रेंडमध्ये आला.
इथे त्याची भेट मोहम्मद शमी बरोबर झाली
शाहीन शाह आफ्रिदी गुडघे दुखापतीवर मात करुन टी 20 वर्ल्ड कपमध्ये पुनरागमन करणार आहे. त्याआधी वॉर्मअप मॅच खेळण्यासाठी तो ब्रिस्बेन येथे आला होता. इथे त्याची भेट मोहम्मद शमी बरोबर झाली. शमी सुद्धा बऱ्याच महिन्यानंतर टी 20 क्रिकेटमध्ये पुनरागमन करणार आहे. आफ्रिदीने नेट्समध्ये जाऊन शमीची भेट घेतली व त्याच्याकडून गोलंदाजीच्या टिप्स घेतल्या.
शाहीन शमीकडून काय शिकला?
शाहीन आफ्रिदीने नेट्समध्ये शमीसोबत वेळ घालवला. त्याच्या मनगटाच्या पोजिशनच कौतुक केलं. शमीकडे उत्तम रिस्ट पोजिशन आहे. त्यामुळे त्याच्या चेंडूची सीम खूप चांगली असते. शमीच्या चेंडूला हवा आणि पीच दोन्हीकडून मदत मिळते. आफ्रिदीने नेट्समध्ये शमीची गोलंदाजी पाहिली व काही गोष्टी त्याच्याकडून शिकला.
— Guess Karo (@KuchNahiUkhada) October 19, 2022
आफ्रिदीची भन्नाट बॉलिंग
शमीशी चर्चा केल्यानंतर शाहीन आफ्रिदीने अफगाणिस्तान विरुद्धच्या सराव सामन्यात जबरदस्त गोलंदाजी केली. त्याने टी 20 वर्ल्ड कपच्या वॉर्मअप मॅचमध्ये आतापर्यंत 6 ओव्हर टाकल्या आहेत. इंग्लंड विरुद्ध आफ्रिदीने 2 ओव्हरमध्ये 7 धावा दिल्या. त्याला विकेट मिळाली नाही. अफगाणिस्तान विरुद्ध 4 ओव्हरमध्ये 29 धावा देऊन 2 विकेट काढल्या. अफगाणिस्तान विरुद्ध दोन्ही विकेट त्याने यॉर्कर आणि स्विंगच्या बळावर काढले. शाहीन आफ्रिदीच्या एका यॉर्करमुळे अफगाणिस्तानच्या एका फलंदाजाला हॉस्पिटलमध्ये न्याव लागलं.
लेफ्ट आर्म पेसर टीम इंडियाची अडचण
शाहीन आफ्रिदीच फॉर्ममध्ये परतणं टीम इंडियासाठी चांगले संकेत नाहीत. भारतीय टॉप ऑर्डरचे फलंदाज डावखुऱ्या वेगवान गोलंदाजांना सहजतेने खेळत नाहीत. रोहित शर्मा टी 20 मध्ये 19 वेळा लेफ्ट आर्म पेसर विरुद्ध आऊट झाला आहे. विराट कोहलीने 13 वेळा विकेट गमावला आहे.