डेब्यु मॅचमधल्या हॅट्ट्रिकमुळे रातोरात स्टार बनला, मोठी चूक झाली, 3 मॅचमध्येच संपलं करिअर
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये जबरदस्त डेब्यु केला. त्याच्याकडे भविष्य म्हणून पाहिलं जायचं. पण लॉकडाऊनमधल्या चुकीमुळे करिअर संपलं. क्रिकेटमध्ये काही प्रतिभावान खेळाडू आहेत. त्यांच्या करिअरची धमाकेदार सुरुवात झाली.
नवी दिल्ली – क्रिकेटमध्ये काही प्रतिभावान खेळाडू आहेत. त्यांच्या करिअरची धमाकेदार सुरुवात झाली. पण ते त्याचा फायदा उचलू शकले नाहीत. कधी नशिबामुळे, तर कधी स्वत:च्या चूकांमुळे हे खेळाडू आपल्या प्रतिभेसोबत न्याय करु शकले नाहीत. श्रीलंकेचा वेगवान गोलंदाज शेहान मधुशंका अशाच गोलंदाजांपैकी एक आहे. आता या श्रीलंकन बॉलरच नाव कोणाच्याही लक्षात नाहीय. मधुशंकाने डेब्यु केला, तेव्हा त्याच्याकडे श्रीलंकेच भविष्य म्हणून पाहिलं जात होतं. पण लवकरच लोक या गोलंदाजाला विसरले.
‘ती’ त्याची शेवटची वनडे मॅच ठरली
वर्ष 2018 च्या सुरुवातीला श्रीलंका, बांग्लादेश आणि झिम्बाब्वेमध्ये बांग्लादेशात तिरंगी मालिका खेळली जाणार होती. श्रीलंकेने या सीरीजसाठी 22 वर्षाच्या शेहान मधुशंकाला पहिल्यांदा टीममध्ये संधी दिली. मधुशंका त्यावेळी फक्त तीन फर्स्ट क्लास आणि लिस्ट ए सामने खेळला होता. सिलेक्टर्सनी त्याच्या गोलंदाजीचा वेग पाहून त्याला टीममध्ये संधी दिली होती. आजच्याच दिवशी 27 जानेवारी 2018 मध्ये मधुशंकाला वनडेमध्ये डेब्युची संधी मिळाली होती. या सामन्यानंतर त्याचं वनडे करिअर संपलं.
डेब्यू मॅचमध्ये घेतली हॅट्रिक
श्रीलंकन टीमने या मॅचमध्ये पहिली बॅटिंग केली. त्यांनी 50 ओव्हर्समध्ये 221 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांग्लादेश टीमचा डाव 142 धावांवर आटोपला. श्रीलंकेला विजय मिळाला. श्रीलंकेच्या विजयात मधुशंकाचा महत्त्वाचा रोल होता. मधुशंकाने पहिल्याच सामन्याच हॅट्रिक घेतली. 37 व्या ओव्हरच्या अखेरच्या तीन चेंडूंवर त्याने मोहम्मद सैफुद्दीन, मशरफे मुर्तजा आणि रुबेल हुसैन यांना आऊट केलं. या एका हॅट्रिकने तो रातोरात चर्चेत आला. त्याला दोन टी 20 मॅचेसमध्ये खेळण्याची संधी मिळाली. त्यानंतर मुधशंका पुन्हा कधी मैदानात दिसला नाही. श्रीलंकन बोर्डाने बंदी का घातली?
बांग्लादेश विरुद्ध टी 20 सामना खेळल्यानंतर दुखापतींनी त्याचा पिच्छा पुरवला. त्याला पुन्हा खेळण्याची संधी मिळाली नाही. वर्ष 2020 मध्ये त्याने जे काही केलं, त्यामुळे त्याचं करिअर कायमस्वरुपी संपलं. श्रीलंकेत त्यावेळी कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन लागला होता. कोणाला एका शहरातून दुसऱ्या शहरात जाण्याची परवानगी नव्हती. याच दरम्यान मधुशंका आपल्या कारने जात असताना पोलिसांनी त्याला अडवलं. गाडीच्या तपासणीत पोलिसांना दोन ग्राम हेरॉइन सापडलं. त्याला पोलीस रिमांडमध्ये पाठवण्यात आलं. श्रीलंकन क्रिकेट बोर्डाने त्याच्यावर बंदी घातली.