Shoaib Akhtar: ‘मी तुला मारुन टाकणार हा…’, शोएब अख्तरचं भारतीय बॉलर्सबद्दल वक्तव्य
भारत आणि पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांबद्दल माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) एक निरीक्षण नोंदवलं आहे. शोएब आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरी तो त्याच्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतो.
लाहोर: भारत आणि पाकिस्तानच्या वेगवान गोलंदाजांबद्दल माजी क्रिकेटपटू शोएब अख्तरने (Shoaib Akhtar) एक निरीक्षण नोंदवलं आहे. शोएब आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्त झाला असला, तरी तो त्याच्या विधानांमुळे नेहमीच चर्चेत असतो. “अलीकडच्या काही वर्षात भारतात चांगले वेगवान गोलंदाज तयार झाले आहेत. त्यांची पाकिस्तान गोलंदाजांबरोबर तुलना करायची झाल्यास, भारतीय गोलंदाजांमध्ये ती ऊर्जा जाणवत नाही” असे शोएब अख्तर म्हणाला. मागच्या आठवड्यात शोएब अख्तरने एका मुलाखतीत विराट कोहली (Virat Kohli) आणि अनुष्का शर्माबद्दल (Anushka Sharma) काही विधानं केली होती. त्यावरुन वाद निर्माण झाला होता. सोशल मीडियावर त्याला अनेकांनी चांगलचं झापलं होतं. विराटच्या खराब फॉर्मसाठी त्याचं अनुष्कासोबतच लग्न, कौटुंबिक जबाबदाऱ्या कारणीभूत असल्याचं त्याने म्हटलं होतं. त्यावर विरुष्काच्या फॅन्सनी शोएबला त्यांच्या व्यक्तीगत आयुष्यात ढवळाढवळ करु नको, असा सल्ला दिला होता.
‘भारतीय गोलंदाजांमध्ये आग दिसत नाही’ शोएब अख्तर अशाच विधानांमुळे नेहमी चर्चेत असतो. पाकिस्तानकडून खेळताना अनेकदा तो वादातही सापडला होता. आता त्याने भारताच्या वेगवान गोलंदाजांबद्दल अशाच पद्धतीचं विधान केलं आहे. “भारत आणि पाकिस्तानमध्ये फरक आहे. भारतात चांगले वेगवान गोलंदाज तयार होत आहेत. पण त्यांच्यात गोलंदाजांमध्ये जी आग लागते, ऊर्जा हवी असते, त्याची कमतरता जाणवते” असे अख्तर म्हणाला.
“वेगवान गोलंदाजाच्या चेहऱ्यावर राग दिसतो. मी तुला मारुन टाकणार अशा पद्धतीचा अॅटिट्यूड दिसला पाहिजे” असे अख्तर पॉडकास्टमध्ये बोलताना म्हणाला. ऑस्ट्रेलियाचा महान गोलंदाज ब्रेट ली सुद्धा त्याच्यासोबत होता.
पाकिस्तानी गोलंदाजांच्या आक्रमकतेमागे मांसाहार कारण भारत-पाकिस्तानच्या गोलंदाजांमध्ये वातावरण आणि खाण-पिण यामुळे हा फरक असल्याचं अख्तरनं सांगितलं. पाकिस्तानकडे इतके प्रभावी गोलंदाज का आहेत? त्यांच वर्चस्व का आहे? यामागच कारणही शोएब अख्तरने सांगितलं. पाकिस्तानी गोलंदाजांमध्ये जो अॅटिट्यूड दिसतो, त्यामागे मुख्य कारण आहे, त्यांनी निवडलेले आदर्श. त्याशिवाय खाद्य-पदार्थ, वातावरण या सर्व घटकांमुळेही पाकिस्तानात आक्रमक गोलंदाज तयार होतात, असे अख्तरने सांगितलं. पाकिस्तानी लोकांच्या जेवणामध्ये मांसाहर असतोच. त्यामुळेच पाकिस्तानी गोलंदाज मैदानावर सिंहासारखे धावतात असा दावा शोएबने केला.
Shoaib Akhtar points x-factor missing in Indian pacers, says Pakistan players ‘run like lions’