मोठा निर्णय! श्रेयस अय्यरच्या खांद्यावर मुंबईच्या कर्णधारपदाची धुरा, हार्दिक-सूर्यकुमार नेतृत्वात खेळणार
श्रेयस अय्यरला आयपीएल मेगा लिलावात मोठी रक्कम मिळाली. ऋषभ पंतनंतर श्रेयस अय्यर दुसरा महागडा खेळाडू ठरला होता. श्रेयस अय्यरच्या खांद्यावर मोठी जबाबदारी पडली आहे. श्रेयस अय्यरकडे मुंबईचं कर्णधारपद सोपवण्यात आलं आहे.
श्रेयस अय्यर सध्या टीम इंडियात स्थान मिळवण्यासाठी धडपड़ करत आहे. दुसरीकडे, देशांतर्गत क्रिकेट स्पर्धेत त्याचं नशिब चांगलं फळलं आहे. आयपीएल मेगा लिलावातही त्याला चांगला भाव मिळाला. असं असताना श्रेयस अय्यरच्या चाहत्यांसाठी आणखी एक आनंदाची बातमी आहे. विजय हजारे ट्रॉफीसाठी श्रेयस अय्यरच्या खांद्यावर कर्णधारपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. ही स्पर्धा 21 डिसेंबरपासून सुरु होणार आहे. तसेच अंतिम सामना 18 जानेवारीला होणार आहे. त्यामुळे आयपीएल 2025 स्पर्धा सुरु होण्यापूर्वी श्रेयस अय्यरला नेतृत्वगुण तपासण्याची चांगली संधी आहे. विशेष करून या संघात सूर्यकुमार यादव, शिवम दुबे आणि शार्दुल ठाकुर यासारखे दिग्गज खेळाडू आहेत. दुसरीकडे, या संघातून अजिंक्य रहाणे आणि पृथ्वी शॉ यांना वगळण्यात आलं आहे. अजिंक्य रहाणे सैयद मुश्ताक अली टी20 चषक मुंबईने जिंकला त्या संघात होता. मात्र विजय हजारे ट्रॉफीसाठी त्याच्या नावाचा विचार केला गेला नाही. दरम्यान, पृथ्वी शॉच्या क्रिकेट कारकिर्दीला उतरती कळा लागली आहे असं म्हंटलं तर वावगं ठरणार नाही. त्याला आयपीएलमधून डावलण्यात आलं असताना हा दुसरा मोठा फटका आहे. मुंबईने विजय हजारे चषकावर चार वेळा नाव कोरलं आहे.
मुंबईचा संघ : श्रेयस अय्यर (कर्णधार), आयुष म्हात्रे, अंगकृष रघुवंशी, जय विश्ट, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, सूर्यांश शेडगे, सिद्देश लाड, हार्दिक लाड (विकेटकीपर), प्रसाद पवार (विकेटकीपर), अथर्व अंकोलेकर, तनुष कोटियन, शार्दुल ठाकुर, रॉयस्टॉन डायस, जुनेद खान, हर्ष तन्ना, विनायक भोईर.
विजय हजारे स्पर्धेत मुंबईचं वेळापत्रक
- मुंबई विरुद्ध कर्नाटक, 21 डिसेंबर, सकाळी 9 वाजता
- मुंबई विरुद्ध हैदराबाद, 23 डिसेंबर, सकाळी 9 वाजता
- मुंबई विरुद्ध अरुणाचल प्रदेश, 26 डिसेंबर, सकाळी 9 वाजता
- मुंबई विरुद्ध पंजाब, 28 डिसेंबर, सकाळी 9 वाजता
- मुंबई विरुद्ध नागालँड, 31 डिसेंबर, सकाळी 9 वाजता
- मुंबई विरुद्ध पुडुचेरी, 3 जानेवारी, सकाळी 9 वाजता
- मुंबई विरुद्ध सौराष्ट्र, 5 जानेवारी, सकाळी 9 वाजता
- प्लेऑफ 9 जानेवारी 2025
- उपांत्यपूर्व फेरी 12 जानेवारी 2025
- उपांत्य फेरी, 15 आणि 16 जानेवारी 2025
- अंतिम फेरी, 18 जानेवारी 2025