शुभमन गिलबाबतची ‘ती’ भविष्यवाणी का होतेय व्हायरलं?; 9 वर्षापूर्वी कुणी आणि काय केलं होतं भाकीत?
शुभमन गिल मोहालीतून खेळत होता. त्याने अमृतसरच्या विरोधात 351 धावा केल्या होत्या. त्याने त्याचा सहकारी फलंदाज निर्मल सिंहच्या साथीने 587 धावा ठोकल्या होत्या.
नवी दिल्ली : आयपीएलच्या तिसऱ्या सीजनमध्ये गुजरात टायटन्सचा धमाकेदार फलंदाज शुभमन गिलने धमाकेदार कामगिरी केली. या सीजनमध्ये गिलने तीन शतक झळकावले. काल तर मुंबई इंडियन्स विरुद्धच्या सामन्यात गिलची बॅट मैदानात तळपत होती. धमाकेदार खेळी करत कालही त्याने कमी चेंडूत शतक झळकावलं. त्यामुळे गिलची जोरदार चर्चा सुरू आहे. मात्र, गिलच्या या अफाट कामगिरीबाबत नऊ वर्षापूर्वीच भविष्यवाणी वर्तवली गेली होती.
शुभमन गिल आयपीएलमध्ये तीन शतक ठोकून सर्वाधिक धावा काढणारा खेळाडू ठरला आहे. 23 वर्षाच्या गिलने स्वत:ला सिद्ध करण्यासाठी नऊ वर्षापूर्वीच विक्रम करायला सुरुवात केली होती. 2014मध्ये वयाच्या अवघ्या 14 व्या वर्षी गिलने जबरदस्त कामगिरी केली होती. पंजाबमध्ये इंटर डिस्ट्रिक्ट क्रिकेट टुर्नामेंट एमएल मरकन ट्रॉफीत गिलने हा कारनामा केला होता. त्यामुळे त्याच्या कोचलाही त्याची ही धमाकेदार खेळी पाहून त्याच्याबाबत भविष्यवाणी करणं भाग पडलं होतं.
मोहालीत महापराक्रम
त्यावेळी शुभमन गिल मोहालीतून खेळत होता. त्याने अमृतसरच्या विरोधात 351 धावा केल्या होत्या. त्याने त्याचा सहकारी फलंदाज निर्मल सिंहच्या साथीने 587 धावा ठोकल्या होत्या. त्यामुळे गिलची प्रचंड चर्चा सुरू झाली होती. त्याच्या या खेळाची चर्चा थांबत नाही तोच त्याने रोपणच्या विरोधात 405 धावांची नाबाद खेळी केली. या सामन्यात गिल सलामीला आला होता. त्याने 50 चौकार लगावले होते. विशेष म्हणजे त्याने एकही षटकार लगावला नव्हता.
मोठे लोक, लहान वयातच…
कोच सुखविंदर सिंग यांनी शुभमनच्या या दोन्ही खेळी पाहिल्या होत्या. त्याचे प्रत्येक शॉट्स, खेळण्याची लकब या सर्व गोष्टीचं सुखविंदर सिंग यांनी निरीक्षण केलं होतं. त्यानंतर त्यांनी गिल बाबत भविष्यवाणी केली होती. महान खेळाडू आपण महान असल्याचं लहानपणीच दाखवून देत असतात, असं सुखविंदर सिंग म्हणाले होते. सचिन तेंडुलकर आणि विनोद कांबळी यांनी शाळेतील टुर्नामेंटमध्ये महापराक्रम केला होता. त्यावेळी त्यांनी आपण मोठे खेळाडू आहोत हे दाखवून दिलं होतं. गिलची या दोन्ही खेळी पाहता तो मोठा खेळाडू होणार असल्याचं दाखवून देत आहे, असं त्यांनी म्हटलं होतं.
या वयात…
405 धावांचा डोंगर उभारताना गिलने या डावात सर्व ग्राऊंड शॉट खेळले आहेत. त्याने हवेत एकही शॉट मारलेला नाही. तसेच त्याने कोणत्याच गोलंदाजाला त्याच्यावर वरचढ होऊ दिलेलं नाही. या वयात अशा पद्धतीने कंट्रोल करणं ही मोठी गोष्ट असते, असंही त्यांनी म्हटलं होतं.