SL vs AFG : अफगाणिस्तानला कसोटीत पराभूत करूनही श्रीलंकेला फायदा नाही, कारण…
श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंकेने अफगाणिस्तानवर 10 गडी राखून विजय मिळवला. त्यामुळे वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये मोठा फरक दिसून येईल असं वाटलं होतं. पण तसं काहीच झालं नाही. उलट जैसे थे स्थितीच कायम राहिली आहे.
मुंबई : वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप 2025 साठी साखळी फेरीचे सामने सुरु आहे. प्रत्येक कसोटी मालिकेनंतर वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप गुणतालिकेवर फरक दिसून येतो. एकही सामना गमावला नाही तर विजयी टक्केवारी 100 असते. तर एखाद दुसरा सामना गमावला तर गुणतालिकेत मोठा उलटफेर दिसून येतो. त्याचबरोबर स्लो ओव्हर रेटसाठी संघांचं मोठं नुकसान झाल्याचं दिसून आल आहे. इंग्लंडला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. दुसरीकडे, श्रीलंका आणि अफगाणिस्तान यांच्यात एकमेव कसोटी सामना पार पडला. या सामन्यात श्रीलंकेने नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात अफगाणिस्तानला 198 धावांवर रोखलं. तसेच श्रीलंकेने पहिल्या डावात 439 धावा करत 241 धावांची आघाडी घेतली. अफगाणिस्तानने दुसऱ्या डावात साजेशी कामगिरी केली. तसेच 296 धावा केल्या आणि विजयासाठी 56 धावांचं आव्हान दिलं. हे आव्हान श्रीलंकेने एकही गडी न गमावता चौथ्या दिवशीच पूर्ण केलं. या विजयामुळे श्रीलंकेला वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये फायदा होईल असं वाटत होतं. पण तसं काही झालं नाही.
वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये अफगाणिस्तानचा संघ नाही. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपसाठी एकूण 9 संघांमध्ये अंतिम फेरीसाठी चुरस आहे. ऑस्ट्रेलिया, भारत, न्यूझीलंड, दक्षिण अफ्रिका, बांगलादेश, पाकिस्तान, इंग्लंड, वेस्ट इंडिज आणि श्रीलंका या संघांचा समावेश आहे. यात अफगाणिस्तानचा सहभाग नसल्याने त्याचे गुण ग्राह्य धरले जाणार नाही. त्यामुळे श्रीलंकन संघ 0 विजयी टक्केवारीसह शेवटच्या स्थानावर कायम आहे.
2023 मध्ये श्रीलंका आणि पाकिस्तान यांच्यात दोन सामन्यांची कसोटी मालिका पार पडली होती. ही मालिका पाकिस्तानने बाबर आझमच्या नेतृत्वात जिंकली होती. 2-0 ने श्रीलंकेला पराभूत केलं होतं. त्यानंतर श्रीलंकेने अफगाणिस्तानविरुद्ध कसोटी सामना खेळला. त्यामुळे त्यांच्या विजयी टक्केवारीत काहीच फरक पडला नाही. श्रीलंकन संघ 22 मार्चपासून बांगलादेश विरुद्ध दोन सामन्यांची कसोटी मालिका खेळणार आहे. त्यानंतर 21 ऑगस्टपासून इंग्लंडविरुद्ध तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेला सामोरे जाणार आहे. वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत स्थान मिळावयचं असेल तर उर्वरित सामन्यात विजय मिळवणं गरजेचं आहे.