SL vs AFG: श्रीलंकेने हद्द केलीना राव! अफगाणिस्तान विरुद्ध बनवला लाजिरवाणा रेकॉर्ड
SL vs AFG: आशिया कपच्या (Asia cup) पहिल्याच सामन्यात उलटफेर झाला आहे. धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे.
मुंबई: आशिया कपच्या (Asia cup) पहिल्याच सामन्यात उलटफेर झाला आहे. धक्कादायक निकालाची नोंद झाली आहे. सलामीच्या सामन्यात दुबळ्या समजल्या जाणाऱ्या अफगाणिस्तानच्या टीमने श्रीलंकेवर (AFG vs SL) विजय मिळवला. या विजयाचं श्रेय अफगाणिस्तानच्या गोलंदाजांना जातं. त्यांनी श्रीलंकेच्या फलंदाजीची वाट लावली. दोन चेंडू बाकी असतानाच, त्यांनी श्रीलंकेचा डाव गुंडाळला. आशिया कप स्पर्धेतील श्रीलंकेच हे आतापर्यंतच सर्वात खराब प्रदर्शन आहे.
अफगाणिस्तानच्या फजलहक फारुकीने श्रीलंकेच्या फलंदाजांना अडचणीत आणलं. त्याने 3.4 षटकात 11 धावा देत महत्त्वाच्या तीन विकेट घेतल्या. अफगाणिस्तानने श्रीलंकेचा डाव 19.4 षटकात 105 धावात गुंडाळला. आशिया कपच्या टी 20 फॉर्मेट मध्ये श्रीलंकेची ही सर्वात कमी धावसंख्या आहे. याआधी 2016 साली श्रीलंकेच्या संघाने बांगलादेश विरुद्ध फक्त 124 धावा केल्या होत्या. त्यानंतर आशिया कप मध्येच यूएई विरुद्ध 129 धावा केल्या होत्या. यावेळी पहिल्यांदाच टीम ऑलआऊट झाली. 2016 साली बांगलादेश आणि यूएई विरुद्ध श्रीलंकेने 8 विकेट गमावल्या होत्या.
फारुकीने दिली चांगली सुरुवात
टॉस जिंकून अफगाणिस्तानने गोलंदाजीचा निर्णय घेतला. फारुकीने पहिल्या ओव्हरच्या शेवटच्या दोन चेंडूंवर कुसल मेंडिस आणि चरिथ असलंका या दोघांना पायचीत पकडलं. दुसऱ्या षटकात नवीन उल हकने पथुम निसंकाला विकेटकीपर रहमानउल्ला गुरबाजकरवी झेलबाद केलं. अफगाणिस्तानला त्याने तिसरं यश मिळवून दिलं. त्यानंतर फारुकीने निर्धाव षटक टाकलं. तीन षटकानंतर श्रीलंकेची धावसंख्या 3 बाद 5 धावा होती.
करुणारत्नेने डाव सावरला
शानदार फलंदाजी करणारा राजपक्षे आणि महीश तीक्ष्णा 13 व्या ओव्हरमध्ये सलग दोन चेंडूंवर रनआऊट झाले. ओव्हर थ्रो वर चोरटी धाव घेण्याचा प्रयत्न करणाऱ्या राजपक्षेला नबीने रनआऊट केलं. तीक्ष्णाला नवीन उल हकच्या थ्रो वर विकेटकीपर गुरबाजने पॅव्हेलियनचा रस्ता दाखवला. नबीने आपल्या स्पेलच्या शेवटच्या चेंडूवर मथीश पथिरानाला आऊट केलं. 15 व्या षटकात श्रीलंकेची स्थिती 9 बाद 75 धावा होती. करुणारत्नेने त्यानंतर 11 व्या क्रमांकाचा फलंदाज दिलशान मदुशंकाला साथीला घेत डाव सावरला. त्यांनी शेवटच्या विकेटसाठी 30 धावांची भागीदारी केली. दोघांनी मिळून श्रीलंकेची धावसंख्या 100 च्या पुढे नेली.